...म्हणून भारत-चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला; केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांचा गौप्यस्फोट 

वृत्तसंस्था
Monday, 29 June 2020

15 जून रोजी भारत आणि चीनमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यामुळे उभय देशांमधील संबंध तणावाचे असताना केंद्रीय मंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नवी दिल्ली- 15 जून रोजी भारत आणि चीनमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. यामुळे उभय देशांमधील संबंध तणावाचे असताना केंद्रीय मंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तंबूमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे भारत आणि चीनमधील सैनिकांमध्ये संघर्ष झाला आणि त्यामुळे भारताचे 20 जवान शहीद झाले असं सिंह म्हणाले आहे. एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

लष्कराचे ‘शक्ती’संकलन; कंपन्यांना सिलिंडरच्या साठवणुकीचे आदेश
15 जूनच्या रात्री पूर्व लडाखच्या गलवान भागात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात दोन्ही देशांची जीवितहानी झाली आहे. चिनी सैनिकांना जाब विचारायला गेलेल्या भारतीय जवानांवर चिनी जवानांनी हल्ला चढवल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, व्ही. के. सिंह यांनी वेगळाच दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भारत आणि चीनमध्ये लष्करी पातळीवर सुरु असलेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांचे सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून मागे जाण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार चिनी सैनिक मागे हटले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी भारतीय सैनिक सीमेवर गेले होते. यावेळी चिनी सैनिक मागे न हटल्याचं त्यांना दिसलं. तसेच त्याठिकाणी तंबू ठोकलेले दिसले. त्यामुळे भारतीय सैनिकांनी तेथील तंबू काढण्याचा प्रयत्न केला. अशावेळी अचानक एका तंबूला आग लागली. ही आग भारतीय सैनिकांनी लावल्याचा चिनी सैनिकांचा समज झाला. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष सुरु झाला, असा दावा सिंह यांनी केला आहे.

पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सेजवर दहशतवादी हल्ला
भारताचे 20 जवान शहीद झाले असले तरी चीनची अधिक जीवितहानी झाली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे 40 पेक्षा अधिक जवान मारले गेल्याचा दावाही व्ही. के. सिंह यांनी केला आहे. मात्र, चीनकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. 

दरम्यान, 5 मे रोजी चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यामध्ये घुसखोरी केली होती. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापटी झाली होती. तेव्हापासून उभय देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. त्यामुळे 45 वर्षांनतर पहिल्यांदाच भारत आणि चीनमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. तसेच दोन्ही देशांनी सीमेवर शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union minister vk singh said reason behind india china clash