Unlock 4 : केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर, मेट्रो सुरु तर शाळा-कॉलेज बंदच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

केंद्र सरकारने Unlock 4 ची नियमावली जाहीर केली आहे. चौथ्या टप्प्यातील अनलॉकची प्रक्रियेत 7 सप्टेंबरपासून मेट्रो सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. 

नवी दिल्ली - केंद्र सरकारने Unlock 4 ची नियमावली जाहीर केली आहे. चौथ्या टप्प्यातील अनलॉकची प्रक्रियेत 7 सप्टेंबरपासून मेट्रो सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. सरकारने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीनुसार 30 सप्टेंबरपर्यंत शाळा आणि कॉलेज बंदच राहणार आहेत. याचा निर्णय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करुन घेण्यात आला आहे. सरकारच्या आदेशानुसार ओपन थेटर 21 सप्टेंबरपासून उघडता येणार आहेत. 

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना घातलेली बंदी 21 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. फक्त 100 लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, मर्यादीत लोक असले तरी सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि पाळणं बंधनकारक असेल. यामध्ये मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं याचं पालन करावं लागेल. तसंच उपस्थितांचे थर्मल स्क्रीनिंग आणि हँडवॉश, सॅनिटायझर ठेवण्यात यावं असंही म्हटलं आहे. 
 

सरकारच्या आदेशानुसार मेट्रो सेवा 7 सप्टेंबरला सुरु होईल. तसंच मेट्रोतही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी लागेल. 7 सप्टेंबर 2020 ला ग्रेडेड पद्धतीने सुरु कऱण्यात यावी असं म्हटलं आहे. यासाठीची नियमावली संबंधित मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात येईल असंही सरकारने सांगितलं. शाळा कॉलेज उघडण्यास मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही. 30 सप्टेंबरपर्यंत शाळा कॉलेजला कुलुप राहणार आहे. ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंग सुरुच राहिल. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 50 टक्क्यापर्यंत शिक्षक आणि इतर स्टाफ शाळेत बोलावता येणार आहे. 

कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार असून इतर भागात राज्य आणि केंद्र शासित प्रदेश लॉकडाउन घोषित करू शकत नाही असंही केंद्र सरकारने नमूद केलं आहे. राज्यांना असा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना केंद्राशी चर्चा करावी लागेल असं या नियमावलीत म्हटलं आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unlock 4 guidelines MHA metro starts from 7 sept school close till month end