अनलॉक 5: चित्रपटगृहे खुली होणार; केंद्र सरकारने जारी केली नियमावली

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 September 2020

केंद्रीय गृहमंत्रालयाने आज रात्री आठच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमानुसार ‘अनलॉक ५’ बाबत दिशानिर्देश जारी केले

नवी दिल्ली- `कोरोना अनलॉक ५` मध्ये चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेसह उघडण्यासाठी, तसेच संख्यामर्यादेसह राजकीय मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विशिष्ट अटींसह जलतरण तलाव यांनाही १५ ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आज रात्री आठच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमानुसार ‘अनलॉक ५’ बाबत दिशानिर्देश जारी केले. त्यानुसार आणखी काही व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दुर्गेची भूमिका साकारल्याने खासदार नुसरत जहाँ यांना जीवे मारण्याची धमकी 

दरम्यान, काही केंद्रीय मंत्रालये व विमानतळांपासून मेट्रोपर्यंत अनेक ठिकाणी सक्ती करण्यात येत असलेल्या “ आरोग्य सेतू” मोबाईल ॲपबाबत जिल्हा प्रशासनांनी लोकांची जागृती करणे सुरू ठेवावे, असा सूचक उल्लेख करण्यात आला आहे.

पालकांच्या परवानगीने शाळा

गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नवीन दिशानिर्देशांनुसार १५ ऑक्टोबरपासून राज्ये शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. मात्र यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी असणे बंधनकारक आहे.

या अनलॉकमधील दिशानिर्देशांचे स्वरूप अधिकाधिक व्यवहार खुले करण्याच्या दिशेने आहे. मात्र, या सर्व परवानग्या कोरोना उद्रेक असलेल्या भागाच्या म्हणजेच कंटेनमेंट झोनच्या बाहेर लागू राहणार आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये मात्र लॉकडाउनची सक्तीने अंमलबजावणी चालूच ठेवावी, असे बजावण्यात आले आहे.

मथुरेतील कृष्ण जन्मभूमी प्रकरणाची याचिका न्यायालयाने फेटाळली

यांना परवानगी

- आंतरराज्य प्रवासी आणि मालवाहतुकीवर कोणतीही बंधने नाहीत
- गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या वंदे भारत मिशन तसेच इतर सेवांच्या विमानांना परवानगी. मात्र आंतर राष्ट्रीय विमानसेवेवर ३१ ऑक्टोबर पर्यंत बंदी कायम.
- बिझनेस टू बिझनेस प्रदर्शनांना परवानगी. मात्र २०० च्या पुढे ग्राहक आणि १० च्या पुढे विक्रेते नसावेत
- शाळा महाविद्यालये सुरू करण्यास मुभा देण्यात आली तरी ऑनलाइन आणि दूरशिक्षण हीच शिक्षणाची आवडती पद्धती यापुढे प्रचलित व्हायला हवी, असे केंद्राचे मत.
- १५ ऑक्टोबरनंतर शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय आणि त्याची पुढची जबाबदारी राज्य सरकारांची असेल. शाळांना राज्यांच्या दिशानिर्देशांचे पालन करणे बंधनकारक.
- उच्चशिक्षण, विशेषतः शास्त्र शाखा आणि डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसाठी परवानगी.
- जलतरण तलाव फक्त प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार संख्येचे बंधन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unlock 5 central government issue new guidelines