Unlock 6.0 Guidelines: आजपासून अनलॉक 6.0 सुरु, जाणून घ्या काय-काय सुरु होणार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

दिल्लीत लग्न समारंभात 200 व्यक्तींना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली- कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अजूनही सुरुच आहे. याचदरम्यान आजपासून देशभरात अनलॉक 6.0 सुरु झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या काही गोष्टी सुरु होणार आहेत. कंटेन्मेंट झोनशिवाय इतर ठिकाणी बाहेरील व्यवहारांना वेग देण्यासाठी रविवारपासून अनलॉक 6.0 सुरु होईल. या आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्रालयाने यामध्ये आणखी सूट देणार नसल्याचे स्पष्ट करत मागील महिन्यात जारी करण्यात आलेले अनलॉक 5.0 चे दिशानिर्देश 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील, असे म्हटले होते. 

दि. 1 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यापासून कठोर नियमांचे पालन करत रेस्तराँ, चित्रपटगृहे, जिम, मॉल, शाळा, जलतरण तलाव, धार्मिक स्थान आणि मेट्रो रेल्वे सेवांना सेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. 1 नोव्हेंबरपासून दिल्लीमध्ये बस पूर्ण क्षमतेने सुरु होतील आणि पश्चिम रेल्वे मुंबईत अतिरिक्त लोकल सुरु करेल. दिल्लीतून आंतरराज्य बससेवा आजपासून (दि.1) सुरु होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा-पैगंबरांची निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद योग्यच; AMU च्या विद्यार्थी नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

त्याचबरोबर गोव्यात कॅसिनो सुरु होईल. उत्तर प्रदेशमध्ये दुधवा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले होणार आहे. आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, हत्ती सफारी आणि जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर पुन्हा एकदा सुरु होणार असून अधिक भाविकांना दर्शनासाठी परवानगी दिली जाईल.

हेही वाचा- ...नाहीतर तुमचे राम नाम सत्य नक्की, 'लव्ह जिहाद'वरुन योगींनी दिला इशारा

दिल्लीत लग्न समारंभात 50 पाहुण्यांना सहभागी होण्याचा नियम हटवण्यात आला आहे. बंद कार्यालयात 200 व्यक्तिंना लग्नात सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, अंत्यसंस्कारासाठी 20 जणांची मर्यादा कायम आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unlock 6 0 Guidelines starts from November 1 know what will open in the country