'अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

विरुद्धलिंगी अविवाहित जोडप्यांना अतिथी म्हणून हॉटेलच्या रुमचा ताबा घेण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा किंवा नियम अस्तित्वात नाही. दोन सज्ञान व्यक्तींमधील लिव्ह इन रिलेशनशीप हे कायद्याच्या चौकटीत मोडत नाहीत.

चेन्नई : अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अविवाहित स्त्री-पुरुष युगुलाला रुम नाकारणाऱ्या हॉटेलांना दणका मिळाला आहे.

'विरुद्धलिंगी अविवाहित जोडप्यांना अतिथी म्हणून हॉटेलच्या रुमचा ताबा घेण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा किंवा नियम अस्तित्वात नाही. दोन सज्ञान व्यक्तींमधील लिव्ह इन रिलेशनशीप हे कायद्याच्या चौकटीत मोडत नाहीत. त्यामुळे अशा दोन सज्ञान अविवाहित जोडप्याने (महिला आणि पुरुष) हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा ठरु शकत नाही,' असे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

तामिळनाडूतील कोइम्बतूरमध्ये याचिकाकर्ता एक सर्व्हिस अपार्टमेंट चालवत होता. पीलामेदू पोलिस स्टेशनच्या पथकाने 25 जून रोजी अपार्टमेंट परिसरात छापा टाकला. त्यावेळी एका खोलीत मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. शिवाय, या खोलीत एक सज्ञान महिला आणि पुरुष आढळून आले. मात्र त्यांचा एकमेकांशी विवाह झालेला नव्हता. त्यानंतर संबंधित पथकाने कोणतीही नोटीस न देता परिसर सील केला. त्यामुळे याचिकाकर्त्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हायरल होत असलेल्या बातमीचा आधार याचिकाकर्त्याने घेतला.

बूकिंग रजिस्टरमध्ये खोलीत राहणाऱ्या स्त्री-पुरुषाचा कोणताही तपशील नव्हता. त्यामुळे या खोलीत अवैध व्यवहार चालत असावेत, असे पीलामेदू पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना तहसीलदारांनी सांगितल्याचे सरकारतर्फे म्हटले आहे.

अविवाहित जोडप्याला खोली देणे हे अनैतिक असल्याचे न्यायालयात सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले होते. परंतु, अविवाहित जोडप्याला खोली दिल्याने कायद्याचे उल्लंघन कसे होते, या न्यायालयाच्या प्रश्नाचे उत्तर सरकारी पक्षाला देता आले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unmarried couple staying in a hotel room not a criminal offence says madras hc