
''राज ठाकरे दबंग नव्हे उंदीर'', उत्तर प्रदेशातील भाजप नेत्याची टीका
नवी दिल्ली : राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Visit) जाणार आहेत. त्यांना भाजप नेते बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. बृजभूषण यांनी आज देखील राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. राज ठाकरे दंबग नाहीतर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर पडत आहेत, असं बृजभूषण सिंह म्हणाले. ते माध्यमांसोबत बोलत होते.
हेही वाचा: राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपनंतर आता रामदास आठवले यांचाही विरोध
''राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांना विरोध केला. त्यांना मारहाण केली. पण, आता मारहाण झाली तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही महाराष्ट्रात पोहोचून त्यांना उत्तर देऊ. ते उत्तर भारतीयांना मारत होते तेव्हा काँग्रेस त्यांना सुरक्षा द्यायची. पण, आता सरकार बदललं आहे. त्यांना आता सुरक्षा मिळणार नाही. कोणीही देश तोडण्याची भाषा करत असेल तर सरकारने त्यांची सुरक्षा हटवली पाहिजे,'' असंही बृजभूषण म्हणाले.
राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेल्या अत्याचारांबाबत माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाहीतर आम्ही त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढचे नागरिक त्यांना विरोध करण्यासाठी सक्षम आहेत. इतका विरोध करू की ते आयुष्यात कधीही अयोध्येत पाय ठेवू शकणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे. आम्हाला मराठ्यांचा विरोध नाही. मराठे अयोध्येत आले तर आम्ही त्यांचं जंगी स्वागत करू. आम्हाला फक्त राज ठाकरेंचा विरोध आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यानुसार ते येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे कार्यकर्ते देखील जाणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून रेल्वेसाठी रावसाहेब दानवसेंसोबत देखील चर्चा केली होती. तसेच पोस्टरबाजी करून लोकांना अयोध्या दौऱ्याला चालण्याचं आवाहन देखील केलं जात आहे.
Web Title: Up Bjp Leader Brij Bhushan Sharan Singh Criticized Raj Thackeray Over Ayodhya Visit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..