राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपनंतर आता रामदास आठवले यांचाही विरोध | Ramdas Athawale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray And Ramdas Athawale

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपनंतर आता रामदास आठवले यांचाही विरोध

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. उत्तर भारतीयांचा राज यांनी अपमान केला आहे. त्यांनी अयोध्येत येण्यापूर्वीच उत्तर भारतीयांची माफी मागावी. नाहीतर त्यांना अयोध्यात घुसू दिले जाणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिला आहे. यावर राज्यात व देशात टीका-टिप्पणी होत आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यात उडी घेतली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे यांनी बाळासाहेबांना धोका दिला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार त्यांना नाही. (Ramdas Athawale Oppose MNS Chief Raj Thakeray's Ayodhya Visit)

ब्रिजभूषण यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. त्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचे आठवले म्हणाले. उत्तर भारतीयांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांना अयोध्यात जाण्याचा अधिकार नाही. उत्तर भारतीयांविरोधात मुंबईत आंदोलन केले. त्यांना आम्ही येथून घालून देऊ अशी भूमिका घेतली, त्या राज ठाकरेंना आम्ही अयोध्येत येऊच देणार नाही, अशी जी भूमिका भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मांडलेले आहे. त्याला आपला पाठिंबा आहे. कारण उत्तर भारतीयांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांना युपीमध्ये जाण्याचा अधिकार नाही, असा टोला रामदास आठवले यांनी राज यांना लगावला आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हेही अयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुसरीकडे ब्रिजभूषण यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊ नये अशी विनंती केलेली आहे.