विरोधी पक्षनेतेपदासाठी राहुल यांना आग्रह; काँग्रेसच्या कार्यकारिणीत नवनिर्वाचित खासदारांची मागणी

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसपक्षाची पहिलीच कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे होते.
urges rahul gandhi for Leader of opposition Demand for newly elected MP in Congress executive
urges rahul gandhi for Leader of opposition Demand for newly elected MP in Congress executiveSakal

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, असा आग्रह आज काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत नेते आणि खासदारांनी केला. यावेळी विचार करतो, एवढे सांगून राहुल गांधी यांनी हा प्रस्ताव नाकारला नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसपक्षाची पहिलीच कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे होते. या बैठकीला काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी उपस्थित होत्या. राहुल गांधी, प्रियांका गांधी, खासदार के. सी. वेणुगोपाल, विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळातील नेते उपस्थित होते.

या बैठकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले व काँग्रेसला जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी ही वेळ थांबण्याची नसून यापुढे पुन्हा नव्या उमेदीने व जिद्दीने कामाला लागण्याची आवश्यकता असल्याचे ठरावात म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्षांचा आग्रह

कॉंग्रेसच्या बैठकीत चर्चेचे मुख्य केंद्र विरोधी पक्षनेतेपदाचे होते. गेल्या दहा वर्षांपासून विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेसकडे नव्हते. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान ५५ खासदार निवडून येणे आवश्यक असते.

काँग्रेसचे २०१४ मध्ये ४४ व २०१९ मध्ये ५२ खासदार निवडून आल्याने या दहा वर्षात अधिकृत विरोधी पक्षनेता लोकसभेत नव्हता. यावेळी काँग्रेसचे ९९ खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर हक्का सांगता येणार आहे. यावेळी विरोधी पक्ष मजबूत असल्याने विरोधी पक्षाचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावे, अशी मागणी अनेक खासदार व नेत्यांनी लावून धरली.

मावळत्या लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी या निवडणुकीत पराभूत झाले. राहुल गांधी यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, या मागणीला मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सहमती दर्शविली. यावेळी राहुल यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही, परंतु ही जबाबदारी स्वीकारण्यापासून नाकारले सुद्धा नाही. मला विचार करायला काही दिवस वेळ द्या, असे राहुल म्हणाले.

या ठरावात ‘इंडिया’ आघाडीच्या विविध पक्ष व नेत्यांचेही आभार मानले. विशेषतः महाराष्ट्रात घटक पक्षातील नेत्यांनी चांगले काम केल्याचा आवर्जून उल्लेख या ठरावात केला आहे. काँग्रेसने प्रचारात काळात मांडलेले मुद्दे यापुढेही प्रभावीपणे मांडण्यात येतील तसेच सकारात्मक व लोकाभिमुख विरोधी पक्ष म्हणून भविष्यात भूमिका पार पाडू, असेही या ठरावात म्हटले आहे.

‘मोदींचा हा नैतिक पराभव’

काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीत एक ठराव संमत करून १८ व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नैतिक पराभव असून या जनादेशाने मोदींच्या कार्यपद्धतीला जनतेनी नाकारल्याचे स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे. या जनादेशाने केवळ भाजपचे राजकीय नुकसान नाही तर मोदी यांचा व्यक्तिगत आणि नैतिक पराभव आहे.

त्यांचे कार्य व चेहरा समोर करून भाजपने मते मागितली होती. जनतेनी मोदी यांचा चेहरा नाकारला आहे. त्यांनी प्रचारात काळात नकारात्मक, जातीय व धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांनी जनतेनी सपशेल नाकारल्याचे या ठरावात म्हटले आहे.

महाराष्ट्रात तयारीला लागा : खर्गे

काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. परंतु येत्या काही दिवसात महाराष्ट्र व हरियानात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही राज्यांमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे.

यावेळी खर्गे यांनी घटक पक्षांच्या साथीने निवडणूक लढण्याचे सूतोवाच केले. महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वाधिक यश मिळाले असून १४ खासदारांसह काँग्रेस हा क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. परंतु काँग्रेसने घटक पक्षांचे निवडणुकीत मिळालेले सहकार्य व भविष्यातील सहकार्यासाठी त्यांच्यासोबत राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com