"हनीट्रॅप'च्या मदतीने काश्‍मिरी युवकांचा वापर

वृत्तसंस्था
सोमवार, 3 डिसेंबर 2018

श्रीनगर : काश्‍मिरी युवकांना दहशतवादी संघटनांकडे ओढण्यासाठी हनीट्रॅपचा वापर केला जात असून, या माध्यमातून काश्‍मीर खोऱ्यातील सक्रिय दहशतवाद्यांपर्यंत शस्त्रे पुरवणे आणि संघटनेत भरती करणे याप्रकारचे काम केले जात आहे 

श्रीनगर : काश्‍मिरी युवकांना दहशतवादी संघटनांकडे ओढण्यासाठी हनीट्रॅपचा वापर केला जात असून, या माध्यमातून काश्‍मीर खोऱ्यातील सक्रिय दहशतवाद्यांपर्यंत शस्त्रे पुरवणे आणि संघटनेत भरती करणे याप्रकारचे काम केले जात आहे 

दोन आठवड्यांपूर्वी बांदीपूर येथील सईद शाजिया या तीस वर्षीय महिलेला गुप्तचर खात्याने पकडले. या तपासादरम्यान तिच्या नावावर सोशल मीडियावर अनेक खाते असल्याचे आढळून आले. फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावर तिचे अनेक नावाने खाते सक्रिय होते. तिला ताब्यात घेण्यासाठी गुप्तचर संस्था तिच्या आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल)वर अनेक महिन्यांपासून लक्ष ठेवून होत्या. ती सोशल मीडियाच्या मदतीने काश्‍मिरातील युवकांशी संवाद साधत, असे आणि एखादे पार्सल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्यांची मदत घेत असे. याशिवाय शाजिया ही पोलिस खात्यातील काही अधिकाऱ्यांच्यादेखील संपर्कात होती. या संपर्काच्या माध्यमातून सीमेपलीकडे सुरक्षा दलाच्या हालचालीविषयी माहिती पुरवत असे. परंतु अतिसंवेदनशील माहिती तिच्यापर्यंत पोचली नाही, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

चौकशीदरम्यान तिने दहशतवादी संघटनांत आणखी काही महिला सक्रिय असल्याचे सांगितले. या महिला युवकांना दहशतवादी संघटनांत भरती होण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचेही तिने सांगितले. तिच्या अटकेपूर्वी एक आठवडा अगोदर 17 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी आसिया जान (वय 28) ला 20 ग्रेनेडसह अटक केली होती. ग्रेनेडशिवाय आणखी काही शस्त्रेही पोलिसांनी तिच्याकडून हस्तगत केली. अशा प्रकारची शस्त्रास्त्राची देवाण-घेवाण अनेक भागांत झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. 

जैशे मोहंमदच्या संपर्कात 

सईद शाजिया ही जैशे मोहंमदचा शेरवान ऊर्फ अली याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. कालांतराने त्याची ओळख पाकिस्तानातील दहशतवादी सुफियान आणि कासिम खान घौरी यांनी करून दिली. जैशेसाठी काम करताना ती शस्त्रपुरवठा करण्यासाठी काश्‍मीर खोऱ्यात सक्रिय झाली होती.

तिच्या फोनकॉलवरही गुप्तचर संस्थेचे लक्ष होते. तसेच, शाजियाला माहिती पुरवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची ओळख पटली असून, त्यालाही ताब्यात घेतले आहे. इरफान असे त्याचे नाव आहे. तिला विविध कलमाखाली अटक केली असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of Kashmiri youth with the help of HoneyTrap