अलिगड मुस्लिम विद्यापीठात जहाल भाषण करणाऱ्या डॉ. काफिल खान यांच्यावर ‘रासुका’ 

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

डॉ. खान हे गोरखपूरच्या बीआरडी वैद्यकीय महाविद्यालाच्या प्रवक्तापदावरून निलंबित करण्यात आले आहे. ते सध्या मथुरा तुरुंगात असून, त्यांना जामीनही मिळाला होता.

लखनौ : अलिगड मुस्लिम विद्यापीठात चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप असलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. काफिल खान यांच्यावर उत्तर प्रदेश सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लावला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. खान हे गोरखपूरच्या बीआरडी वैद्यकीय महाविद्यालाच्या प्रवक्तापदावरून निलंबित करण्यात आले आहे. ते सध्या मथुरा तुरुंगात असून, त्यांना जामीनही मिळाला होता. मात्र त्यांना बाहेर सोडण्यात आले नव्हते. जामिनाचा आदेश उशिरा पोचल्याने गुरुवारी (ता. १३) त्यांची मथुरा जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली नव्हती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी आज त्यांच्यावर ‘रासुका’अंतर्गत कारवाई केल्याने त्यांना आता तुरुंगात ठेवणार असल्याचे अलिगडचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश कुल्हारी यांनी सांगितले. डॉ. काफिल यांच्यापासून राष्ट्रीय सुरक्षा किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचेल, असे अधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यांच्या प्रतिबंधात्मक नजरकैदेत वाढ करण्याची परवानगी ‘रासुका’ने दिली आहे.

आणखी वाचा - मासिक पाळी नाही हे सिद्ध करण्यासाठी उतरवले मुलींचे कपडे 

आणखी वाचा - मुंबईत सायनचा उड्डाणपूल आजपासून बंद, वाचा बातमी
  
काफिल खान यांनी डिसेंबर महिन्यात नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनामध्ये सहभाग घेत चिथावणीखोर भाषण केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना गेल्या महिन्यात मुंबईतून अटक केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचाही खान यांच्यावर आरोप आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh aligarh muslim university dr kafeel khan national security act