ओवैसी मोठे नेते, त्यांचं आव्हान स्वीकारतो- योगी आदित्यनाथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yogi aadityanath and owaisi

ओवैसी मोठे नेते, त्यांचं आव्हान स्वीकारतो- योगी आदित्यनाथ

लखनौ- मजलिस-ए-इत्तेहादूलचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला आव्हान दिले असेल तर भाजप कार्यकर्ते ते स्वीकारतील, असे प्रत्यूत्तर देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप तीनशेपेक्षा जास्त जागा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'योगी यांना आपला पक्ष व मित्र पक्ष पुन्हा सत्तेवर येऊ देणार नाहीत. योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही,' असे ओवेसी यांनी शनिवारी सांगितले होते. (uttar pradesh assembly election Yogi Adityanath accepted mim asasuddin Owaisi challenge)

त्याबाबत आदित्यनाथ म्हणाले की, ओवेसीजी एक मोठे राष्ट्रीय नेते आहेत. ते प्रचारासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जात असतात. जनतेमध्ये त्यांची स्वतःची अशी विश्वासार्हता आहे. त्यांनी आव्हान दिले असेल तर आमचे कार्यकर्ते ते स्वीकारतील. आमच्या पक्षाच्या यशाबाबत मला कोणतीही शंका नाही. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत केंद्रीय नेतृत्वाने ३०० पार जागांचे लक्ष्य ठेवले असून तेवढ्या जागा आम्ही जिंकू, असा विश्वास आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.

एमआयएम १०० जागा लढविणार

ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाची उत्तर प्रदेशात शंभर जागा लढविण्याची योजना आहे. ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षासह (एसबीएसपी) त्यांनी युती केली आहे. एसबीएसपीने इतर छोट्या नऊ पक्षांसह युती केली असून त्यास भागीदारी संकल्प मोर्चा असे संबोधले आहे. सर्व जागा लढविण्याची या युतीचा निर्धार आहे.

दरम्यान, पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं दिसत आहे. योगी यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. पण, यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांचे पद धोक्यात असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजप पक्षश्रेष्टींच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. पण, शेवटी उत्तर प्रदेशात पुढील विधानसभा निवडणुकीसाठी योग्य आदित्यनाथ हेच मुख्यमंत्री पदाचे चेहरे असतील असं स्पष्ट करण्यात आलं.