समाजवादी परफ्यूमला भ्रष्टाचाराची दुर्गंधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

समाजवादी परफ्यूमला भ्रष्टाचाराची दुर्गंधी

आग्रा : समाजवादी पक्षाने (सपा) त्यांच्या नावाने पर्फ्युम काढला असला तरी त्यास त्यांच्या राजवटीमधील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीचा दुर्गंधी आहे, जी कोणत्याही सुवासामुळे नष्ट होणार नाही, अशी टीका उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केली.

सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी नुकताच समाजवादी पर्फ्युम लाँच केला. त्यावरून प्रमुख विरोधी पक्षाला टोला लगावण्याची संधी शर्मा यांनी साधली. ते म्हणाले की, आधीच्या सरकारचा द्वेषभाव, जातीयवाद, लांगूलचालन, गुन्हेगारी कदापी धुवून निघणार नाही. अत्तर हे स्वच्छता, पारदर्शकता, सुशासन आणि जबाबदारीचे प्रतीक असले पाहिजे.

हेही वाचा: दिल्लीत जानेवारीत सायबर हिंसेवरील परिषद

सपाने नुकतीच सुहेलदेव भारतीय समाज पक्षासह (सुभासपा) युती जाहीर केली आहे. याबद्दल शर्मा म्हणाले की, विरोधी पक्षांनी कितीही आघाड्या केल्या तरी त्यांचा पराभवच होणार आहे. लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा, दर वेळी वेगवेगळी समीकरणे जुळवून युती करूनही विरोधकांचा धुव्वा उडाला आहे. आता आणखी एकदा पराभूत होण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. फक्त यावेळी त्यांच्याबरोबर छोटे पक्ष आहेत.

'अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष असो किंवा इतर कोणत्याही पक्षाचा एकच हेतू आणि तो म्हणजे मोदींची बदनामी करणे, पण त्यांचे प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाहीत. भाजप हा प्रशिक्षित आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा भक्कम पाया असलेला पक्ष आहे. काळाच्या ओघात तो नष्ट होणार नाही.'

- दिनेश शर्मा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री

loading image
go to top