esakal | साधा सर्दी-ताप, तरी डॉक्टर म्हणाला कोरोना झालाय; पुढे काय झालं वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

Doctor

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद येथे एक विविच प्रकार पाहायला मिळाला आहे.

साधा सर्दी-ताप, तरी डॉक्टर म्हणाला कोरोना झालाय

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद येथे एक विविच प्रकार पाहायला मिळाला आहे. साधा सर्दी आणि खोकला झाल्याने हॉस्पिटलमध्ये गेलेल्या रुग्णाला डॉक्टरने ठीक न तपासताच कोरोना झाल्याचं सांगून टाकलं. कोरोना झाला की नाही हे तपासण्यासाठी टेस्ट करावी लागते, पण डॉक्टरने थेट कोरोना रुग्ण ठरवून टाकल्याने नातेवाईकांचा पारा चढला. त्यांनी पुढचा-मागचा विचार न करता डॉक्टरला बेदम मारहाण सुरु केली. विशेष म्हणजे डॉक्टरलाचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली. (uttar pradesh firozabad doctor beaten by relatives of patients)

राकेश नावाच्या डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर आणखी एक धक्कादायक खुलासा झाला. राकेशकडे मेडिकलची डिग्री नव्हती, तो कोणत्याही अनुभवाशिवाय लोकांवर उपचार करत होता. मंगळवारी नगला जवाहर येथील एका व्यक्तीने आपल्या वडिलांना सर्दी-खोकला झाल्याने डॉक्टरला घरी तपासणीसाठी बोलावलं. राकेश डॉक्टरने वडिलांना न तपासताच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगून टाकलं. केवळ सर्दी आणि खोकला झालेल्या व्यक्तीला कोरोना रुग्ण ठरवल्याने नातेवाईकांना राग अनावर झाला. त्यांनी डॉक्टराला मारहाण सुरु केली. यात त्याच्या डोक्याला मार लागला असल्याचं सांगितलं जातंय.

हेही वाचा: प्रायव्हसीच्या अधिकाराचा सन्मान, पण...; सरकारने WhatsAppला सुनावलं

डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिस तपासासाठी गावात पोहोचले, तेव्हा डॉक्टरच्या अनेक करामती समोर आल्या. डॉक्टर गावातील लोकांना कोरोनाची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. जिल्ह्यातील आरोग्य विभागाला माहिती देऊन 14 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा तो इशारा द्यायचा. अशा धमकी देऊन डॉक्टरने अनेकांकडून पैसे घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशात डॉक्टरांवरील जबाबदारी खूप वाढली आहे. अनेक डॉक्टर दिवसरात्र कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी खर्ची घालत आहेत. अशात काही बोगस डॉक्टरांमुळे त्यांचे नाव बदनाम होत आहे.