esakal | उत्तर प्रदेशात व्हायरल तापाचा हाहाकार; योगी आदित्यनाथ भेटलेल्या मुलीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

व्हायरल तापाचा हाहाकार; योगी आदित्यनाथ भेटलेल्या मुलीचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद इथं व्हायरल तापाची साथ पसरली आहे. यामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशा रुग्णांची भेट घेतली होती.

व्हायरल तापाचा हाहाकार; योगी आदित्यनाथ भेटलेल्या मुलीचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनऊ - उत्तर प्रदेशातील फिरोजाबादसह इतर जिल्ह्यांमध्ये व्हायरल तापाची साथ पसरली आहे. यामुळे आतापर्यंत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अजुनही तापाची ही साथ सुरुच आहे. दरम्यान, आता अशी माहिती समोर येत आहे की, एका 14 वर्षांच्या मुलीचा या तापामुळे मृत्यू झाला आहे. या मुलीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एक दिवसापूर्वी भेटले होते.

योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी फिरोजाबादचा दौरा केला होता. व्हायरल तापाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ते उत्तर प्रदेशातील मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते. तिथं योगी आदित्यनाथ यांनी 14 वर्षीय कोमलशी संवाद साधला होता. तसंच चांगले उपचार दिले जातील असंही म्हटलं होतं. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या भेटीनंतर 24 तासांच्या आतच त्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

मुलीचे वडिल रामकुमार हे हाथरसमध्ये राहतात. पण सध्या ते फिरोजाबाद इथं एका भाड्याच्या घरात राहतात. रामकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलला तीन दिवस आधी ताप आला होता. सोमवारी सकाळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मेडिकल कॉलेजला भेट दिली आणि त्यावेळी कोमलची विचारपूस केली होती.

हेही वाचा: आधीचे सरकार असताना दर तीन दिवसांनी दंगल : योगी आदित्यनाथ

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोमलच्या शरिरात प्लेटलेट्सची संख्या कमी झाली होती. तिच्या वडिलांनी मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी हट्ट केला होता. मात्र रुग्णालयाने तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिला हलवण्यास नकार दिला होता. तरीही अखेर तिचे वडिल तिला घेऊन खासगी रुग्णालयात गेली. रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

फिरोजाबादमध्ये व्हायरल तापाने गेल्या काही दिवसांपासून हाहाकार माजवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच लोकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

loading image
go to top