अयोध्येतील राम मंदिराचा 'जय'; उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 29 January 2021

72 व्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) राजपथावरील परेडमध्ये अनेक राज्यांच्या चित्ररथांचा समावेश होता.

नवी दिल्ली- 72 व्या प्रजासत्ताक दिनी (Republic Day) राजपथावरील परेडमध्ये अनेक राज्यांच्या चित्ररथांचा समावेश होता. या चित्ररथातून राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे चित्रण दाखवण्यात आले होते. या चित्ररथांपैकी राम मंदिराचे मॉडेल दाखवणाऱ्या झाकीच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी गुरुवारी दिल्लीत पुरस्कार देऊन सन्मान केला.  

राम मंदिराच्या मॉडेलची उत्तर प्रदेशची झाकी

रिपब्लिक दिनाच्या दिवशी देशाची राजधानी दिल्लीमध्ये राजपथावर आयोजित परेडमध्ये अनेक राज्यांच्या चित्ररथांचा समावेश होता. जेव्हा राम मंदिराच्या मॉडेलचा चित्ररथ परडेमध्ये सामिल झाला तेव्हा उपस्थित लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. लोकांनी टाळ्या वाजवून आणि आपल्या जागी उभे राहून चित्ररथाला प्रतिसाद दिला. अनेक लोक हात जोडून उभे राहिल्याचं दिसून आलं, तसेच अनेकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

दशकातलं पहिलं बजेट देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण; PM मोदी संसदेत...

राम मंदिर आणि दीपोत्सवाची झलक असलेली झाकी

यूपीच्या चित्ररथावर पहिल्या भागात महर्षी वाल्मिकी यांना रामायणाची रचना करताना दाखवले होते. मध्य भागात अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचे मॉडेल दाखवण्यात आले आहे. पहिल्यांदाच राजपथावर अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिर आणि दीपोत्सवाची झलक दिसली. 

सुचना अधिकारी शिशिर यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. या ट्विटनुसार राम मंदिराचे मॉडेल दाखवणाऱ्या चित्ररथाला पहिले स्थान मिळण्याचा गौरव मिळाला आहे. त्यांनी यासाठी सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. त्यांनी गीतकार विरेंद्र सिंह यांचे विशेष आभार मानले. 

दरम्यान, यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे महाराष्ट्राच्या चित्ररथावरून पिंपळनेर (ता.पारनेर) येथील महाराष्ट्राच्या संत परंपरेतील पाचवे स्थान असलेले संत निळोबा महाराज यांचे कार्य देशासमोर आणले गेले. या चित्ररथावर महाराष्ट्रातील १४ संतांच्या प्रतिकृतीबरोबरच श्री. संत निळोबा महाराज यांची प्रतिमा व त्यांच्या अभंगाच्या ओळी झळकल्या.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्यानंतर पाचवे स्थान संत निळोबा महाराज यांचे आहे. तसेच पंढरपूर पालखी सोहळ्यात संत निळोबा महाराज यांच्या पालखीला मानाचे नववे स्थान देण्यात आले. चित्ररथावर संत निळोबा महाराज यांच्या प्रतिमेखाली 'पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले कृपाळ' या अभंगाची दोन कडवी लिहली आहेत. संत निळोबा महाराज यांनी ब्राह्मण समाजात जन्म घेऊनही त्यांनी बहुजन समाजातील संत तुकाराम महाराज यांना गुरू मानले होते. अध्यात्माबरोबरच सामाजिक सुधारणांचा संदेश देणारे संत निळोबा महाराज यांचा एक क्रांतीकारक संत म्हणून संताच्या इतिहासात नावलौकिक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttar Pradesh Ram Temple tableau on Republic Day bags first prize