दशकातलं पहिलं बजेट देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण; PM मोदी संसदेत दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 January 2021

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होत असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे.

UNION BUDGET 2021 : 

नवी दिल्ली : आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सभागृहाच्या खासदारांना 11 वाजता संबोधित करतील. तसेच आज संसदेचं आर्थिक सर्वेक्षण देखील सादर केलं जाणार आहे. याप्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल झाले आणि त्यांनी या बजेटच्या कामकाजाला सदिच्छा देत सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, या दशकातील हे पहिले बजेटचं सत्र आहे. भारताच्या  उज्ज्वल भविष्यासाठी हे दशक महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रारंभापासूनच काम करणं आवश्यक आहे. हे दशक ठरवलेल्या संकल्पांना सिद्ध करण्यासाठीची संधी आहे. त्यामुळे या दशकाचा भरपूर उपयोग करण्यासाठीची सकस चर्चा या सत्रात होवो, असं त्यांनी म्हटलं. पुढे मोदी म्हणाले की, सरकार सर्व मुद्यांवर या सत्रात चर्चा करणार. चर्चेमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या विचारांवर कृती होवो, ही आपल्या देशाची अपेक्षा आहे. या आकांक्षांना ओळखत या सत्राला आधिक उत्तम  बनवलं जाईल, असा माझा विश्वास आहे. असं त्यांनी म्हटलं.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2020 हे वर्ष असं होतं की, या वर्षात एक नाही, तर तब्बल चारपाच मिनी बजेट आम्हाला द्यावे लागले. आता सादर केला जाणारा 2021चा अर्थसंकल्प हे या सादर केल्या गेलेल्या मिनी बजेट्सचं पुढचंच पाऊल म्हणून ओळखलं जाईल, असं मला वाटतं.

हेही वाचा - सरकार बॅकफूटवर; आंदोलन सुरुच राहिल, ठाम निर्धारासह शेतकऱ्यांच्या पुन्हा ठिय्या

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होत असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. देशातील 16 विरोधी पक्षांनी बहिष्कार घालत असल्याचं निवेदन प्रसिद्ध केलं होतं. याबाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काल गुरुवारी माहिती दिली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आययूएमएल, आरएसपी, एमडीएमके, केरळ कांग्रेस आणि एआययूडीएफ या पक्षांचा यात समावेश आहे. सोमवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी भारताचा 2021 या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. सकाळी अकरा वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेसमोर मांडण्यास सुरुवात करतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UNION BUDGET 2021 pm modi says Budget will be seen as a part of those 4-5 mini budgets