
कामाच्या पहिल्याच दिवशी घात; रुग्णालयाच्या छताला लटकलेली आढळली तरुणी
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयाच्या मागे एका तरुणीचा मृतदेह लोखंडी सळईला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत सापडल्याच्या एक दिवस आधीच या तरूणीने रुग्णालयात काम करण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी तरूणीच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.
शनिवारी दुल्लापुरवा गावातील न्यू जीवन रुग्णालयात ही घटना घडली. नाझिया (19) असे मृत महिलेचे नाव असून ती तिकाना गावातील रहिवासी आहे. सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी ती शुक्रवारी रुग्णालयात रूजू झाली होती. दुसर्या दिवशी हॉस्पिटलच्या कर्मचार्यांनी नाझियाचा मृतदेह शोधून काढला, या तरूणीचा मृतदेह नुकत्याच सुरु झालेल्या रूग्णालयाच्या इमारतीच्या मागे लोखंडी सळईला लटकलेला आढळून आला. नाझिया त्या दिवशी नाईट शिफ्टमध्ये काम करत होती.
रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली, त्यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली उतरवून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, नाझिया शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमध्ये झोपली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे तिचा मृतदेह सापडला.
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, तिची हत्या करून तिचा मृतदेह रुग्णालयाच्या मागे लटकवण्यात आला. नाझियाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुग्णालयात काम करणाऱ्या चौघांविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.