

Uttarakhand CM Pushkar Singh Dhami plays a traditional drum and dances with tribal artists at the Adi Rangotsav in Khatima.
esakal
उत्तराखंड : उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा येथे तीन दिवसीय ‘उत्तराखंड आदि रंगोत्सव’ उत्साहात सुरू झाला आहे. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, लोककला आणि अस्मिता यांचे दर्शन घडवणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम आणि केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत केले.
उद्घाटनानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कलाकारांमध्ये सहभागी होत स्वतः पारंपरिक ढोल वाजवला. कलाकारांसोबत नृत्य करत त्यांनी महोत्सवाचा उत्साह वाढवला. या वेळी आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत सुविधांवर भर देण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.
खटीमा एकलव्य विद्यालयासाठी रु. १० कोटी
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांनी खटीमा येथील एकलव्य आदर्श निवासी विद्यालयाच्या (EMRS) पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी सुमारे रु. १० कोटींची घोषणा केली. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वसतिगृह उभारण्यासाठी सुमारे रु. ४ कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच बांधकाम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, दुर्गम सीमावर्ती भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी शिक्षणाची सुविधा मिळावी, यासाठी मुख्यमंत्री धामी यांनी पिथौरागढ जिल्ह्यातही नवीन एकलव्य आदर्श निवासी विद्यालय सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली.
थारू, बोक्सा, जौनसारी, भोटिया आणि राजी संस्कृतीचे दर्शन
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तराखंडमधील आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे कौतुक केले. थारू, बोक्सा, जौनसारी, भोटिया आणि राजी या समाजांच्या परंपरा उत्तराखंडच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले.
रिजिजू यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. भूस्खलन, पूर आणि बोगदा दुर्घटनांसारख्या नैसर्गिक संकटांच्या वेळी धामी यांनी दाखवलेले नेतृत्व आणि धैर्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध राज्यांतील कलाकारांचा सांस्कृतिक संगम
‘उत्तराखंड आदि रंगोत्सवा’मध्ये उत्तराखंडसह महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, मिझोराम आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील आदिवासी कलाकार सहभागी झाले आहेत.
या कलाकारांकडून विविध राज्यांतील लोकनृत्ये, लोकगीते, पारंपरिक वाद्ये आणि हस्तकलेचे सादरीकरण करण्यात येत आहे. विविध भाषा, वेशभूषा आणि परंपरा असूनही देशाच्या सांस्कृतिक मुळांमध्ये असलेली एकता या महोत्सवातून अधोरेखित होत आहे. त्यामुळे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचा संदेशही या महोत्सवातून दिला जात आहे.
मुख्यमंत्री धामी यांनी ‘आदि रंगोत्सव’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानाचा उत्सव असल्याचे सांगितले. जनजातीय समाजाला शिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा, रोजगार आणि पायाभूत सुविधांशी जोडून आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.