म्हातारे, आमदार तुझ्याशी का संपर्क करतील? भाजप नेत्याचे महिला काँग्रेस नेत्याबद्दल अपशब्द

सकाळ ऑनलाइन टीम
Wednesday, 6 January 2021

काही दिवसांपूर्वी इंदिरा हृदयेश यांनी भाजपचे पाच ते सहा आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते.

डेहराडून- राजकारणात अनेक मोठे नेते बोलण्याच्या नादात मर्यादा गमावून बसतात. वारंवार अशा वक्तव्यांमुळे नवे वाद निर्माण झाले आणि होतातही. यामध्ये सर्वच पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. उत्तराखंडमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसच्या महिला नेत्यांबद्दल बोलताना मर्यादा ओलांडली आणि नवा वाद सुरु झाला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आता माफीची मागणी केली आहे. नैनिताल येथे आयोजित एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत यांनी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या इंदिरा हृदयेश यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत भगत हे इंदिरा हृदयेश यांना 'म्हातारी' असे म्हणताना दिसतात. 'एएनआय'ने आपल्या टि्वटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

भगत म्हणाले की, अनेक आमदार त्यांच्या संपर्कात आहेत, असे आमच्या विरोधी पक्षनेत्या म्हणतात. अगं, म्हातारे ते तुझ्याशी का संपर्क साधतील ?. त्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. या कार्यक्रमात अनेक महिलाही सहभागी झाल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्यानंतर अनेक जण अस्वस्थ झाल्याचे दिसले. 

हेही वाचा- विरोधकांचा सूर ऐका, संसदेतही येत चला; प्रणवदांच्या अखेरच्या पुस्तकात मोदींना सल्ला

हा व्हिडिओ नैनिताल येथे मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाचा आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर भगत यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीका सुरु झाली. इंदिरा हृदयेश यांनी भगत यांनी माफी मागावी अशी मागणी केली. इंदिरा हृदयेश म्हणाल्या की, माझ्याविरोधात अपशब्दांचा वापर करण्यात आल्याचे मी ऐकले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष याशिवाय ते पक्षाचे प्रतिनिधीही आहेत. त्यांच्या अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे मला दुःख झाले आहे. यावर त्यांनी माफी मागितली पाहिजे. 

हेही वाचा- तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल कोरोनाची लस; जाणून घ्या लशीकरणाची संपूर्ण प्रक्रिया

काही दिवसांपूर्वी इंदिरा हृदयेश यांनी भाजपचे पाच ते सहा आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. इंदिरा हृदयेश या हल्दानी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्या उत्तराखंड सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होत्या. 

हेही वाचा- पाय, बरगडी तोडली, फुप्फुसावरही घाव; सामुहिक बलात्कारानंतरच्या मृत्यूने UP पुन्हा हादरलं


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhand BJP chief Bansidhar Bhagat derogatory statement on congress leader Indira Hridayesh