तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल कोरोनाची लस; जाणून घ्या लशीकरणाची संपूर्ण प्रक्रिया

सकाळ ऑनलाइन टीम
Wednesday, 6 January 2021

सरकारने लशीकरणासाठी एक योजना बनवली आहे. लशीच्या खरेदीची प्रक्रिया जशी पूर्ण होईल. त्याचवेळी लशीकरणाची मोहीमही सुरु होईल.

नवी दिल्ली- ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूच्या दहशतीदरम्यान भारत कोरोना लशीकरणाच्या प्रक्रियेसाठी आता सज्ज झाला आहे. देशात सर्वात आधी 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. यामध्ये फ्रंट लाइन वर्कर्स म्हणजेच आरोग्य कर्मचाऱ्यांपासून सुरक्षा जवान, 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक आणि आधीपासून आजारी असलेल्यांचा यात समावेश आहे. सरकारने लशीकरणासाठी एक योजना बनवली आहे. लशीच्या खरेदीची प्रक्रिया जशी पूर्ण होईल. त्याचवेळी लशीकरणाची मोहीमही सुरु होईल. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनुसार पुढील आठवड्यापासून देशात जगातील सर्वात मोठी लशीकरणाची मोहीम सुरु होईल. 

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी लशीकरणाची संपूर्ण माहिती दिली. पहिल्या टप्प्यात लस उत्पादक कंपन्या हवाई मार्गाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सुरु केलेल्या प्राथमिक लस केंद्रात पोहोचवतील. त्यांना सरकारी मेडिकल डेपोही म्हटले जाते. सध्या देशात अशा प्रकारचे चार डेपो आहेत. यामद्ये मुंबई, कर्नाल, चेन्नई आणि कोलकाताचा समावेश आहे. या डेपोमध्ये विविध राज्यांत असलेल्या 37 राज्य लस केंद्रांमध्ये रेफ्रिजरेटेड व्हॅनच्या माध्यमातून लशीची डिलिव्हरी दिली जाईल. तेथून आपल्या गरजेनुसार लशींचा स्टॉक करण्याची जबाबदारी संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची असेल. त्यानंतर राज्यातील जिल्ह्यांमधील केंद्रांत लस पाठवली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेवर डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवले जाईल. 

हेही वाचा- आतली खबर : राजकारण्यांना ED ची चौकशी म्हटली की धडकी का भरते ?

या अभियानाच्या दुसऱ्या हिस्स्याबाबत सांगताना भूषण म्हणाले की, या मोहिमेचा दुसरा भाग हा लशीच्या उमेदवारांची ओळख पटवणे आणि त्यांच्या नोंदणीबरोबरच लस देणे हा असेल. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्सना आपली नोंदणी करण्याची गरज नसेल. कारण त्यांची माहिती त्यांच्या विभागामार्फत आधीच सरकारकडे आहे आणि ही माहिती कोविन ऍपमध्ये नोंदवण्यात आलेली आहे. 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना आणि आजारी असलेल्यांना नोंदणी करावी लागेल. 

एकीकडे सरकार 300 मिलियन म्हणजेच 30 कोटी नागरिकांना लस देण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांकडून खरेदीची प्रक्रिया सुरु आहे. तर दुसरीकडे सरकार स्थानिक स्तरावर लशीकरणाच्या मोहिमेला गती देण्यासाठी डिलिव्हरी व्यवस्थापनापासून लस पुरवण्याच्या पद्धतीवर काम करत आहे. भारत सरकार कशा पद्धतीने सर्वात आधी 30 कोटी नागरिकांना लस देणार याची प्रक्रिया जाणून घेऊयात. 30 कोटी नागरिकांना लस देण्यासाठी तीन टप्प्यातील प्रक्रिया राबवली जाणार आहे. 

हेही वाचा- 'ठाकूर' लिहिलेल्या बुटांची विक्री; UP पोलिसांनी मुस्लिम विक्रेत्याला घेतलं ताब्यात

पहिला टप्पाः लशीचा वाहतूक
1. कोरोनावरील लस कंपनीच्या उत्पादक केंद्रातून विमान वाहतुकीच्या माध्यमातून प्राथमिक लशीच्या केंद्रापर्यंत आणला जाईल. 
2. प्राथमिक लस केंद्रातून पुन्हा रेफ्रिजरेटर असलेल्या वाहनांतून लस राज्य लस केंद्रांवर पोहोचवली जाईल. 
3. राज्य लस केंद्रातून पुन्हा रेफ्रिजरेटर असलेल्या वाहनांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय लस केंद्रावर पोहोचवली जाईल. 
4. जिल्हा लस केंद्रातून पुन्हा लशीची डिलिव्हरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली जाईल. कारण लशीला एका योग्य तापमानाची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण डिलिव्हरी प्रक्रियेत रेफ्रिजरेटर असलेल्या वाहनांचा उपयोग होईल. 

दुसरा टप्पाः लाभार्थी शोधणे आणि लस देणे
1. प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवलेल्या लशी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून उपकेंद्रात किंवा जिथे लशीकरण होणार आहे, तिथे पोहोचवल्या जातील. 
2. लशीकरणासाठी सर्वात आधी लाभार्थींची नोंदणी करावी लागेल. (आरोग्य कर्मचारी आणि जवानांना वगळून)
3. त्यानंतर लशीकरणासाठी वेळ दिली जाईल. 
4. लाभार्थींना लस दिली जाईल. 

तिसरा टप्पाः लस दिल्यानंतर फॉलोअप
1. लस दिल्यानंतर लाभार्थींना मेसेज मिळेल.
2. यूनिक हेल्थ आयडी मिळेल
3. क्यूआर कोड बेस्ड प्रमाणपत्रही मिळेल
4. लशीकरणानंतर दुष्परिणामाबाबत (साइड इफेक्ट) सरकार लाभार्थीच्या संपर्कात असेल आणि त्यांच्याकडून माहिती घेत राहिल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How will the corona vaccine reach you Learn the whole process of covid vaccination in india