UP: अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर बनविण्यासाठी योगींनी कसली कंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath

UP: अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर बनविण्यासाठी योगींनी कसली कंबर

नवी दिल्ली/लखनौ : प्रत्येक सरकारी खात्याने १०० दिवस, सहा महिने आणि एका वर्षाचे उद्दिष्ट निश्चित करावीत असा आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. प्राधान्य देण्याची गरज असलेली दहा क्षेत्रे निश्चित करावीत आणि राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर बनविण्यासाठी त्या क्षेत्रांत झटून काम करावे, असेही त्यांनी नमूद केले.

योजना भवनात त्यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. मुख्य सचिव, महसुल मंडळ अध्यक्ष, कृषी उत्पादन आयुक्त, अतिरिक्त मुख्य सचिव, आदी त्यावेळी उपस्थित होते. विविध खात्यांमधील रिक्त जागा भरण्यासाठी प्राधान्य देण्यास त्यांनी सांगितले.

योगी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार नव्या भारतात नवा उत्तर प्रदेश आकारास येत आहे. हे काम त्वरेने तडीस नेण्यात यावे. प्रशासनामधील गैरप्रकारांचे निर्मुलन हे आपल्यासमोरील पहिले आव्हान आहे, पण गेल्या पाच वर्षांत सुशासन निर्माण झाले आहे.

भाजपने लोककल्याण संकल्पपत्र या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यातील आश्वासने पाच वर्षांच्या कालबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या.

भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलतेचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. सरकारी योजना सामान्य माणसापर्यंत पोचविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापरावर त्यांनी भर दिला. सरकारी कार्यालयांत वेगवान, वक्तशीर कार्यपद्धतीसाठी त्यांनी इ-कार्यालय योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्यास सांगितले. पंचायत सहाय्यकांची नियुक्ती करून पंचायती राज व ग्रामसचिवांचा कारभार आणखी सुधारण्यात यावा असे त्यांनी नमूद केले.

गोरखपूर-वाराणसी विमान सुरू

केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते गोरखपूर-वाराणसी विमानसेवेचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद््घाटन झाले. लखनौमध्ये योगींनी सांगितले की, राज्यात सध्या नऊ विमानतळे कार्यरत आहेत. तेथून देशभरातील ७५ ठिकाणे जोडली गेली आहेत. चार वर्षांपूर्वी हाच आकडा केवळ चार विमानतळे आणि २५ ठिकाणे इतकाच होता. हे सारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. त्यामुळे आता हवाई स्लीपर घालणारे सुद्धा विमानातून प्रवास करू शकतात. बाबा गोरक्षनाथ यांची भूमी आता बाबा विश्वनाथ यांच्या भूमीशी हवाई माध्यमातून तोडली गेली आहे, असे उत्स्फूर्त उद््गारही त्यांनी काढले. त्यांनी ज्योतिरादित्य यांचे आभार मानले.

आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील कामगिरीशीच स्पर्धा करावी आणि सुशासन आणखी भक्कम करावे असे आवाहन मी करीत आहे. यासंदर्भात आपली स्पर्धा स्वतःशीच असेल. आपल्याला चांगला कारभार आणखी जोमाने पुढे न्यावा लागेल.

- योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

Web Title: Uttarpradesh Economy One Trillion Dollar Yogi Adityanath

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Yogi Adityanatheconomy