
देशभरातील कोरोना लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता सरकारने आता लसीकरणासाठी घालण्यात आलेली वेळेची मर्यादा काढून टाकली आहे. यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली - देशभरातील कोरोना लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता सरकारने आता लसीकरणासाठी घालण्यात आलेली वेळेची मर्यादा काढून टाकली आहे. यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे. लोक आता त्यांच्या सोयीनुसार दिवसभरामध्ये कधीही लस घेऊ शकतील, लोकांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या वेळेलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तितकेच महत्त्व देतात, असेही हर्षवर्धन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेमध्ये या नव्या बदलाचा तपशील जाहीर केला. या लसीकरणासाठी सकाळी ९ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घालण्यात आलेली मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. या वेळेनंतर देखील लसीकरण करायचे की नाही याचा निर्णय रुग्णालयांना घ्यायचा आहे, असे ते म्हणाले. को-विन २.० या ॲपवर लसीकरणाच्या वेळेचा कोणताही तपशील दिलेला नाही. ही कालमर्यादा आता काढून टाकण्यात आली आहे. एखाद्या रुग्णालयाची तशी क्षमता असेल आणि यंत्रणाही परवानगी देत असेल सायंकाळी पाचनंतर देखील लसीकरण केले जाऊ शकते फक्त त्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून परवानगी घेणे आवश्यक आहे, असेही भूषण यांनी नमूद केले.
Edited By - Prashant Patil