भारतात नव्या स्ट्रेनची एन्ट्री पण घाबरण्याचं कारण नाही; वैज्ञानिकांकडून दिलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 29 December 2020

यूकेमधून परतलेल्या काही लोकांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने चिंता वाढली आहे.

ब्रिटन- यूकेमधून परतलेल्या काही लोकांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने चिंता वाढली आहे. 70 टक्के अधिक वेगाने पसरणाऱ्या या स्ट्रेनचे मंगळवारी देशात सात रुग्ण आढळून आले आहेत. असे असले तरी एक समाधानाची माहिती समोर येत आहे. सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांनी नव्या स्ट्रेनविरोधात लढण्यासाठी लस प्रभावी असल्याचा दावा केला आहे. 

भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रो. के. विजय राघवन यांनी मंगळवारी सांगितलं की, ''यूके आणि साऊथ आफ्रिकेमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूविरोधात लढण्यासाठी लस प्रभावी ठरेल. कोणतेही पुरावे सापडले नाहीत, जे दाखवून देतील की कोरोना लस नव्या स्ट्रेनविरोधात लढण्यास अपयशी ठरली आहे.''  वैज्ञानिक सल्लागारांचे हे वक्तव्य लोकांची चिंता कमी करणारं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, ''यूकेमध्ये नवीन स्ट्रेन आल्याच्या बातमीनंतर आम्ही जवळजवळ 5 हजार जिनोम सिक्वेंसिंग केली आहे. अजून आम्ही ही संख्या वाढवणार आहोत.'' नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल म्हणाले की, ''थंडीच्या या काळात अजून मोठी संख्या कोरोना विषाणूसाठी अतिसंवेदनशील आहे. यूके म्यूटेंट अनेक देशात पोहोचला आहे, ज्यात भारताचाही समावेश आहे. या म्यूटेंटची आपल्या वेगळी गती असू शकते, त्यामुळे आपल्याला सावध रहावं लागेल. कोणताही निष्काळजीपणा चालणार नाही.''  

दरम्यान, भारतातही ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत. ब्रिटनमधून परतलेल्या 7 रुग्णांमध्ये म्यूटेंट कोरोना विषाणू आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना विलगीकरणात (आयसोलेशन) ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या निकटच्या व्यक्तींनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. एकूण 33 हजार प्रवासी इंग्लंडहून भारतातील वेगवेगळ्या विमानतळावर 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत आले होते. यामध्ये 114 जण बाधित आढळून आले. त्यांचे नमुने जेव्हा जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले. तेव्हा त्यात सहा जणांमध्ये नवे स्ट्रेन आढळून आले. यामधील तीन नमुने एनआयएमएचएएनएस, बंगळुरु, 2 सीसीएमबी, हैदराबाद आणि एनआयव्ही-पुणे 1-1 आहेत. दरम्यान, या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील एकही रुग्ण नसल्याचे सांगण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccines will work against the variants detected in UK and South Africa  K Vijay Raghavan