
Vande Bharat : ‘वंदे भारत’ लवकरच परदेशातही धावणार
नवी दिल्ली : वेगासाठी प्रसिद्ध असलेली ‘वंदे भारत’ ही ट्रेन लवकरच परदेशामध्ये देखील दाखल होणार असून २०२५-२६ पर्यंत युरोप, दक्षिण अमेरिका आणि पूर्व आशियाचे मार्केट काबीज करण्याचे ध्येय भारताने निश्चित केले असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. स्लीपर कोचचा समावेश असलेली गाडी २०२४ च्या पहिल्या तिमाहीपासून धावू लागेल. पुढील काही वर्षांमध्ये ७५ वंदे भारत गाड्यांच्या माध्यमातून दहा ते बारा लाख किलोमीटरचे अंतर व्यापण्याचा रेल्वेचा मानस आहे.
निर्यातीला योग्य अशा गाड्यांच्या निर्मितीसाठीची इकोसिस्टिम आपल्याला पुढील काही वर्षांमध्ये तयार करावी लागेल. पुढील तीन वर्षांमध्ये आम्ही ४७५ ‘वंदे भारत’ गाड्या बाजारात आणण्याच्या विचारात आहोत. जागतिक बाजारपेठेमध्ये देखील आमचे उत्पादन टिकाव धरू शकेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सगळ्या प्रकारची आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करण्याचे सामर्थ्य या गाडीमध्ये आहे, असेही या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
आवाजही कमी
या गाडीचा आवाजाची मर्यादा ही ६५ डेसिबल एवढी असेल विमानाच्या आवाजाशी तुलना करता तो शंभरपटीने कमी आहे. या गाड्या ब्रॉडगेजसाठी पूर्णपणे फिट आहेत. या वेगवान गाडीच्या चाचणीसाठी जोधपूर विभागामध्ये गुढा- थाताना मिठारीदरम्यान ५९ किलोमीटर लांबीचा टेस्टिंग ट्रॅक उभारण्यात येईल. ज्या गाड्यांची परदेशात निर्यात करायची आहे त्यांची या ठिकाणी चाचणी घेण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.