
Amit Shah : जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा सद्यस्थितीवर आज महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू-काश्मीरबाबत अत्यंत महत्त्वाची बैठक आज दिल्लीत झाली. या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकारी, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्य सचिव ए के मेहता,भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ‘ तसेच सीआरपीएफ आणि एनआयए या तपास संस्थांचे प्रमुखही सहभागी झाले होते.
जम्मूच्या सिध्रा भागात पकिस्तानातून घुसखोरीच्या प्रयत्नांत असलेल्या चार सशस्त्र अतिरेक्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केल्यानंतर शहा यांनी दिल्लीत बोलावलेल्या या तातडीच्या व महत्वाच्या उच्चपदस्थ बैठकीत लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा सद्यस्थितीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर दोन वर्षे उलटली त्यानंतर आता या केंद्रशासित प्रदेशात विकासाचा वेग वाढवण्याचे केंद्राचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने सूचना देत आहे.
खोऱ्यातील सध्याची सुरक्षा व्यवस्था आणि विकास प्रकल्पांबाबत ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येणाऱ्या विकास कार्यक्रमांवरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली व केंद्राकडून काही महत्वाच्या सूचनाही करण्यात आल्यात.
सिध्रा भागात चार सशस्त्र दहशतवाद्यांचा सुरक्षा जवानांनी आज खात्मा केल्यानंतर शहा यांनी ही तातडीची बैठक घेतली. २६ जानेवारीपूर्वी ससश्त्र दलांसह जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानी अतिरेक्यांचा आणखी एक मोठा कट उधळून लावला. पाकिस्तानातून घुसखोरी केल्यानंतर हे दहशतवादी ट्रकमधून काश्मीरच्या दिशेने जात होते. जम्मू रेंजचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग यांनी सांगितले की ट्रकचालक फरार झाला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.