ज्येष्ठ अभिनेते स्वरूप दत्त यांचे निधन

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

ज्येष्ठ बंगाली अभिनेते स्वरूप दत्त (वय 78) यांचे बुधवारी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे अभिनेते पुत्र शरण दत्त हे आहेत. वयोमानामुळे ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

कोलकाता ः ज्येष्ठ बंगाली अभिनेते स्वरूप दत्त (वय 78) यांचे बुधवारी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे अभिनेते पुत्र शरण दत्त हे आहेत. वयोमानामुळे ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

अर्धांगवायूचा झटका आल्याने दत्त यांना गेल्या शनिवारी (ता. 13) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याने त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी सहाच्या दरम्यान दत्त यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले, असे रुग्णालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. 

स्वरूप दत्त यांचा जन्म 22 जून 1941 मध्ये झाला होता. बंगालच्या चित्रपटसृष्टीतील 60 ते 70 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेते अशी त्यांची ओळख होती. तपन सिन्हा यांच्या "अपनजान' या चित्रपटातून स्वरूप दत्त यांनी 1968मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पश्‍चिम बंगालमध्ये 1960मधील राजकीय अशांततेविरोधात भाष्य करणारा हा चित्रपट होता. याशिवाय "सगिना महातो', "हर्मोनियम', "पिता, पुत्र आणि मा ओ मेये' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. 

"अपनजान' या चित्रपटातील स्वरूप दत्त यांचा अद्वितीय अभिनय प्रेक्षकांमध्ये कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने बंगालमधील चित्रपटसृष्टीचे कधीच भरून न येणारे नुकसान झाले आहे. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veteran Bengali Actor Swarup Dutta Dies At 78