चांदणी चौक बाजारपेठेचा कायापालट

chandani chowk
chandani chowk

दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांपैकी लाल किल्ल्याच्या समोरचा व जगप्रसिद्ध जामा मशिदीच्या सान्निध्यातील चांदणी चौक या बाजारपेठेचा कायापालट झाला आहे. बादशहा शहाजहानच्या काळात या शहानाजहानाबादच्या बाजाराच्या मधोमध पाट वाहात. थुइथुई उडणारी कारंजी होती. पण, गेल्या चाळीस वर्षात चांदणी चौकात इतकी गर्दी वाढली, की तिथं चालणं मुश्किल झालं होतं. कॅनॉट प्लेस, जनपथ, सरोजनी नगर, लाजपत नगर, करोल बाग, खान मार्केट, चावडी बाजार, कमला नगर या दिल्लीच्या प्रमुख बाजारपेठा. परंतु, मॉल्सची गर्दी होऊ लागली, तसे ग्राहक त्याकडे वळले. तरीही परंपरागत बाजारपेठातील गर्दी कमी झाली नाही. दिल्लीची लोकसंख्या ग्रेटर दिल्लीसह सुमारे दोन कोटींच्या घरात आहे. त्यामुळे बाजारपेठांना ग्राहकांची कमतरता नाही. आठवड्याचा कोणताही दिवस असो, बाजारपेठात गर्दी दिसणार. करोनामुळे रोडावलेल्या बाजारपेठा असंख्य वस्तू व मालांनी आणि माणसांनी भरू लागल्यात. 

त्यातील चांदणी चौकात ऐतिहासिक शिखांचा शीश गंज हा गुरूद्वारा, पेशवेकालीन शिवमंदीर व दिल्ली महानगर पालिकेची भव्य इमारत आहे. शिवाय, प्रसिद्ध परोठेवाली गली, असंख्य निमुळत्या गल्ल्यातील दुकाने, शहाजहानकालीन घंटेवाला मिठाईवाला ही आकर्षणे आजही आहेत. सारे काही तसेच आहे. परंतु, कोणत्याही नियोजनाच्या अभावामुळे तिथं साऱ्याच गोष्टींची इतकी काही गर्दी झाली, की नको ते चांदणी चौकात जाणे, असे लोकांना वाटू लागले. परंतु, येत्या 31 मार्च नंतर तिथं दिल्लीकरांची, ग्राहकांची वर्णी लागणार. तोवर शहाजहानाबाद पुनर्विकास महामंडळाची योजना पूर्ण होणार आहे. 

लाल चौक ते फतेहपुरी मशिद दरम्यानच्या 1.3 किलोमीटर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे. दिल्ली सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांच्या मते, चांदणी चौकात रूंद पदपथ, पिण्याच्या पाण्याची मशिन्स, एटीएम्स, स्वच्छता गृहे, मोगल कालीन स्थापत्याशी मिळते, जुळते बांधकाम, चांदणी चौकाला भेट देणाऱ्या लोकांना बसण्यासाठी बाके आदी ठेवण्यात येणार असून, सायकल रिक्षा व विजेवर चालणाऱ्या रिक्षांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही वाहनांना प्रवेश असणार नाही. तेथील दुकांनाना माल पोहोचविणाऱ्या ट्रक्स आदींना प्रवेश मिळेल, तो फक्त रात्री. 

चांदणी चौकाच्या पुनर्विकासाची योजना मूळची 2004 मधील. काँग्रेस पक्षाच्या नेत्या शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना 2008 मध्ये त्यांनी शहाजहानाबाद पुनर्विकास महामंडळ स्थापन केले व 2018 च्या डिसेंबरमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने काम सुरू केले. पण, जुने बांधकाम काढून टाकण्याबाबत बरेच आक्षेप घेतले गेले. काहींजण न्यायालयातही गेले. परंतु, त्यांचे आक्षेप रद्द ठरविण्यात येऊन विकासाचे काम सुरू झाले. करोनाच्या साथीमुळेही विकासकामाला अडथळे आले. प्रकल्पावर शंभर कोटी रुपये खर्च होणार आहेत. आपल्या देशात गावागावातून, चाळी, झोपडपटट्यातून वीज व टेलिफोनच्या तारांची भेंडोळी सर्वत्र दिसतात. तशी चांदणी चौकातही होती. त्यांना, तसेच मलमूत्र विसर्जनासाठी जमीनीखाली असणारे बांधकाम यांचेही नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे, ग्राहकांना चांदणी चौक भेटीचा अनोखा अनुभव मिळेल. विशेष म्हणजे, चांदणी चौकाचे महत्त्व ध्यानात घेऊन दिल्ली मेट्रोने येथे अनेक ठिकाणी अंडरग्राउंड स्टेशन्स बांधली. त्यामुळे राजीव चौक वा अन्य ठिकाणाहून तेथे जाणे सोयीचे झाले. याच परिसरात खारी बावलीची बाजारपेठ आहे. तेथे सुकामेवा व दिल्लीचे प्रसिद्ध छोले–भटुरे व दूथ व जिलबी विकणारी खास दुकाने ग्राहकांना आकर्षित करतात. जवळच प्रसिद्ध लाहोरी गेट, जुना बाजार ही घाऊक व्यापारपेठ आहे. 

पुनर्विकासाच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्य वृत्तानुसार, चांचणी चौक सर्व व्यापारमंडळाचे अध्यक्ष संजय भार्गव यांच्यामते, 31 मार्चनंतर सर्वाधिक लक्ष ठेवावे लागणार आहे, ते पदपथावर बेकायदेशीररित्या दुकाने, हातगाड्या ठेऊन व्यवसाय करणाऱ्यांवर, तसेच, पदोपदी ग्राहकांकडून भीक मागणाऱ्यांवर. चांदणी चौकात अजून सीसीटीव्ही लागलेले नाही. त्याचे काम चालू आहे. इन्टाकचे सल्लागार एजीके मेनन यांच्या मते चांदणी चौकाची भेट ग्राहकांना एक वेगळाच अनुभव देऊन जाईल.

जुन्या बाजारपेठांचा कायापालट आपल्या देशात सर्वत्र व्हावयास हवा. त्यातील पदपथांचे रुंदीकरण, स्वच्छता, दिव्यांची व दुकानांची रोचक मांडणी करणे आवश्यक आहे. असा अनुभव पाश्चात्य देशात, तसेच, बीजिंग, शांघाय, ग्वांगझाव, शेंझेन, सिंगापूर, बँकॉक, तैवान, मनिला, जकार्ता, सोल आदी पौर्वात्य देशातील शहरातून येतो. या देशांनी जपलेली बाजारपेठांची ही संस्कृती आपल्या शहरातून रुजविली पहिजे. स्मार्ट सिटी म्हणून काही शहरातून हाती घेतलेले प्रकल्प रेंगाळले आहेत. त्याकडे तेथील महानगर पालिकांचे लक्ष नाही. पुण्यात बाणेरमधील केवळ एका रस्त्यावर स्मार्ट सिटीचा अनुभव येतो. सिक्कीमची राजधानी गंगटोक येथील मुख्य बाजारपेठेला भेट देताना आल्हाददायक अनुभव येतो. असंख्य फुलापानांनी भरलेली नर्सरी ग्राहकांना टवटवीत करते. नेपाळ हा गरीब देश, तथापि, काठमांडूतील थामेल बाजार प्रत्येकाला आकर्षित करतो, तो अरूंद रस्त्यावरील झमगाट व असंख्य वस्तूंनी जागोजाग भरलेल्या वस्तूंनी. थिंफू (भूतानची राजधानी) येथेही तसा वैशिष्ठ्यपूर्ण इमारतींनी सजलेला बाजार आहे. तसाच आता चांदणी चौक देशी व परदेशी पर्यटक व ग्राहकांना आकर्षित करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com