New Delhi : रामायण रेल्वेच्या वेटरना भगवा पोशाख नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

desh

रामायण रेल्वेच्या वेटरना भगवा पोशाख नको

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या बहुचर्चित रामायण एक्सप्रेसची पुढील फेरी १२ डिसेंबरपासून सुरू होणार असली तरी त्यातील वेटर व अन्य कर्मचाऱ्यांना साधूंसारखा वेष व भगवा पोशाख दिल्याने साधूमहंत संतापले आहेत. ही वेषभूषा त्वरित बदलावी अन्यथा गाडीच्या मार्गावरील प्रत्येक स्थानकात तीव्र निदर्शने करू असा इशारा देणारे पत्र उज्जैनच्या परमहंस आखाडा परिषदेसह अन्य संघटनांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविले आहे.

अयोध्येपासून रामेश्वरमला जाणारी रामायण एक्सप्रेस पहिल्यांदा सात नोव्हेंबरला सुटली तेव्हा ती हाऊसफुल्ल झाली होती. यामुळे उत्साहित झालेल्या रेल्वेने १२ डिसेंबरला पुढील गाडी रवाना होईल असे जाहीर केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या भगव्या पोषाखासह गळ्यातील रूद्राक्षाच्या माळांवर उज्जैन परमहंस आखाडा परिषदेचे अवधेश गिरी यांनी रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आक्षेप घेतला आहे.

दिल्लीच्या सफदरजंगपासून सुरू होणारी रामायण एक्सप्रेस ७५०० किमीचा प्रवास करेल. अयोध्येतील रामजन्मभूमी, हनुमानगढी, नंदीग्राम, सीतामढी, वाराणसी, प्रयागराज, श्रिंगवेरपुरम, चित्रकूट, पंचवटी- नाशिक, हम्पी-किष्किंधा, भद्राचलम या मार्गाने १७ दिवसांत रामेश्वरमपर्यंतची यात्रा पूर्ण करेल. या दरम्यान रस्त्याच्या मार्गाने नेपाळच्या सीता जन्मभूमीचेही दर्शन घडविण्यात येईल.

रामायण एक्सप्रेसच्या वेटरना भगवा गणवेश देणे हा तद्दन मूर्खपणा आहे. सरकारने हा निर्णय त्वरित बदलावा व ज्याने तो घेतला त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी.

-महंत सुधीरदास महाराज, निर्वाणी आखाडा

loading image
go to top