निर्वासित पाकिस्तानी हिंदूंसह विहिंप साजरा करणार स्वातंत्र्य दिन

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 1 जुलै 2019

पाकिस्तानसह शेजारच्या देशांतील अत्याचारांमुळे भारतात पळून आलेल्या लाखो निर्वासित हिंदूंसह दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी यंदा स्वातंत्र्य दिनाचे विशेष कार्यक्रम साजरे करण्याची घोषणा विश्‍व हिंदू परिषदेने केली आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानसह शेजारच्या देशांतील अत्याचारांमुळे भारतात पळून आलेल्या लाखो निर्वासित हिंदूंसह दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी यंदा स्वातंत्र्य दिनाचे विशेष कार्यक्रम साजरे करण्याची घोषणा विश्‍व हिंदू परिषदेने केली आहे.

पाकिस्तानातून आलेले किमान दीड लाख हिंदू एकट्या महाराष्ट्रात आहेत, असे विहिंपच्या विदेश विभागाचे केंद्रीय मंत्री प्रशांत हरताळकर यांनी "सकाळ'ला सांगितले. पाकिस्तानात जीव व अब्रू वाचविण्यासाठी भारतात सहकुटुंब आलेले हनुमानप्रसाद भागडी व इतर पाकिस्तानी नागरिकही या वेळी उपस्थित होते. 

दरम्यान, पाकिस्तानी हिंदूंवर त्या देशात चाललेले अत्याचार व मानवाधिकारांचे हनन रोखण्यासाठी मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय दबाव आणावा, यासाठी विहिंप प्रयत्नशील आहे. यासाठी सरकारने आणलेले व राज्यसभेत कॉंग्रेसने अडविलेले नागरिकता विशेष कायदा विधेयक त्वरित मंजूर करावे, अशीही त्यांची मागणी आहे. रोहिंग्यांबाबत मौनात गेलेले कॉंग्रेस व इतर विरोधक दुटप्पी धोरण राबवीत आहेत.

विहिंप सध्याच्या संसद अधिवेशनाच्या काळात सर्वपक्षीय खासदारांना भेटून तशी आग्रही मागणी करतील, असेही हरताळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ""गेल्या चार वर्षांत पाकिस्तानातील अत्याचारांमुळे भारतात आलेल्या साडेसहा लाख नागरिकांना भारत सरकारने नागरिकत्व दिले. यातील दहा हजार लोक दिल्लीत राहात आहेत. मात्र अद्याप साडेतीन लाख निर्वासित हिंदूंचा दीर्घकालीन व्हिसा मंजूर करण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. व्हिसाबरोबरच त्याबाबतच्या प्रक्रियांचे सुलभीकरण करणेही गरजेचे आहे. हे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना भेटून करण्यात येईल.'' 

पाकमधील अत्याचारांची दखल घ्या 

भारतात सध्या दहा लाखांपर्यंत पाकिस्तानी हिंदू शरणार्थी राहात आहेत. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवरील अनन्वित अत्याचार सुरूच आहेत. काश्‍मीरमधील घटनांची त्वरित दखल घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी पाकिस्तानमधील अत्याचारांची दखल घ्यावी, यासाठी जागतिक दबाव आणण्याबाबतही विहिंप मोदी सरकारला आग्रही विनंती करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VHP will Celebrate Independence day with exiled Pakistani Hindus