
Mahendra Singh Sisodia : भाजपमध्ये सहभागी व्हा, अन्यथा बुलडोझर चालवू!
गुना/भोपाळ : मध्य प्रदेशचे पंचायत राज मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. रुथियाई शहरात एका सभेत बोलतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
त्यात ते काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या बुलडोझरच्या कारवाईचा सामना करावा, असे म्हणताना दिसतात. देशातील इतर भाजपशासित राज्यांप्रमाणे मध्य प्रदेशातही विविध गुन्ह्यांतील आरोपींच्या घराचा बेकायदा भाग बुलडोझरच्या माध्यमातून पाडला जात आहे.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या कारवाईचे कौतुक केले आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्री सिसोदिया यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ सिसोदिया यांनी म्हटले आहे, की काँग्रेस सदस्यांनो ऐका, तुम्ही हळूहळू सत्ताधारी पक्षात प्रवेश करा.
मध्य प्रदेशात यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपच विजयी होऊन सरकार स्थापन करेल. मामांचा (मुख्यमंत्री चौहान) बुलडोझर तयार आहे, असेही राघोगड नगरच्या पालिका निवडणुकीच्या सभेत बोलताना म्हटले आहे. काँग्रेसने महेंद्रसिंह सिसोदिया यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
‘धमकी दिली नाही’
महेंद्रसिंह सिसोदिया यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. आपण काहीही चुकीचे बोललो नाही. इतर पक्षाच्या सदस्यांना माझ्या पक्षात येण्याविषयी विचारण्यात काय चूक आहे, असा सवाल त्यांनी केला. मी कोणालाही धमकी दिली नाही. माझा व्हिडिओ पूर्णपणे ऐकावा, असेही ते म्हणाले.