Vidhan Sabha 2019 : हरियानात विरोधकांमधील दुफळी भाजपच्या पथ्यावर

ज्ञानेश्‍वर बिजले
Saturday, 19 October 2019

हरियानाच्या राजकारणातील अविभाज्य भाग बनलेली घराणेशाही आणि जाटांचे वर्चस्व मोडून काढीत पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजप सज्ज झाले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लोकदलामध्ये दुफळी पडल्यामुळे, हरियानात भाजप व काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होत आहे. विरोधी पक्षांतील मतविभागणीचा फायदा भाजपलाच मिळण्याची शक्‍यता आहे

हरियानाच्या राजकारणातील अविभाज्य भाग बनलेली घराणेशाही आणि जाटांचे वर्चस्व मोडून काढीत पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजप सज्ज झाले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लोकदलामध्ये दुफळी पडल्यामुळे, हरियानात भाजप व काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होत आहे. विरोधी पक्षांतील मतविभागणीचा फायदा भाजपलाच मिळण्याची शक्‍यता आहे. हरियानाच्या राजकारणात पहिल्यापासूनच जाट घराण्यांचे वर्चस्व राहिले. गेल्या निवडणुकीत मात्र, जाट वगळता अन्य समाजाची मोट बांधत भाजपने सत्ता हस्तगत केली. भाजपनेही मुख्यमंत्री पद जाटांकडे न सोपविता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक मनोहरलाल खट्टर यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपविली. भाजप आताची निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवित आहे. स्वच्छ प्रतिमा, सरकारचे चांगले प्रशासन. बिगर जाट नेता ही त्यांची बलस्थाने आहेत. विरोधी बाजूला मुख्यमंत्रीपदी दहा वर्षे राहिलेले जाट नेते भुपेंद्रसिंह हुडा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. या दोघांसह लोकदल, जननायक जनता पक्ष, आप हे प्रमुख पक्ष रिंगणात आहेत.

'त्या' तिघांनीच केली कमलेश तिवारींची हत्या 
 

राजकीय बलाबल
महाराष्ट्रासोबतच हरियाना विधानसभेच्या 90 जागांसाठीही 21 ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. 2009 मध्ये केवळ चार आमदार असलेल्या भाजपने 2014 मध्ये जोरदार मुसंडी मारीत 47 जागा जिंकत बहुमत मिळविले. 2014 मध्ये लोकदलाने 19, काँग्रेसने 15, तर हरियाना जनहित काँग्रेसचे दोन आमदार होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व दहा जागा जिंकताना भाजप उमेदवारांनी विधानसभेच्या 90 पैकी 79 मतदारसंघांत आघाडी घेतली. काँग्रेसला विधानसभेच्या दहा जागांवर, तर जननायक जनता पक्षाला एका जागेवर मिळालेल्या मतांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. भाजपची मते गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 23 टक्‍क्‍यांनी वाढून 58 टक्‍क्‍यांवर पोहोचली, तर काँग्रेसची मतेही साडेपाच टक्‍क्‍यांनी वाढून 28.5 टक्‍क्‍यांवर पोहोचली. लोकदलाचा मात्र धुव्वा उडाला. त्यांची मते 22.5 टक्‍क्‍यांवरून दोन टक्‍क्‍यांपर्यंत घसरली.

राज्यसभेत भाजप बहुमताच्या जवळ

भाजपची प्रचारात आघाडी
लोकसभा निवडणुकीतील यश कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी 18 ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा काढून प्रचाराचा बिगूल फुंकला. तीन हजार किलोमीटर प्रवास करीत त्यांनी सर्व 90 मतदारसंघाचा दौरा केला. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा यांच्या रोहटक या बालेकिल्ल्यात झालेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पक्ष विस्तारासाठी भाजपने गेल्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांना प्राधान्य दिले, तर यावेळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लोकदलातील अकरा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापैकी दोन मुस्लीम आमदारांना उमेदवारी देताना भाजपने स्वपक्षातील एका मंत्र्यांसह सात आमदारांना उमेदवारी नाकारली. भाजपने राष्ट्रीय हॉकी संघाचे कॅप्टन संदीपसिंह, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता पैलवान योगेश्‍वर दत्त, महिला कुस्तीपटू बबिता फोगट, अभिनेत्री टिकटॉकस्टार सोनाली फोगाट यांचाही उमेदवारीच्या यादीत समावेश केला.

ओला वापरताय? मग हे वाचाच

काँग्रेसमधील खांदेपालट व व्यूहरचना
माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मुलगा कुलदीप बिश्‍नोई यांचा हरियाना जनहित काँग्रेस गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये विलीन झाला. लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नसले, तरी काँग्रेसची मते 5.5 टक्‍क्‍यांनी वाढून 28 टक्‍क्‍यांवर पोहोचली. या पराभवानंतर पक्षात नेतृत्वावरून वाद उफाळला. माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह हुडा यांनी राजीनाम्याचा इशारा दिला. त्यानंतर पक्षांतर्गत हालचाली झाल्या. पक्षाचे नेते राहूल गांधी यांच्या नजिकचे मानले जाणारे प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांच्या जागी कुमारी सेलजा यांची निवड करण्यात आली. पक्षाची सुत्रे पुन्हा 2005 ते 2014 या दहा वर्षांत मुख्यमंत्री राहिलेल्या हुडा यांच्या हाती गेली. हुडा व सेलजा यांनी तन्वर यांच्या पाठिराख्यांना उमेदवारी नाकारली. जागा वाटपातील असंतोषामुळे तन्वर यांच्या पाठिाराख्यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांच्या घरासमोर निदर्शने केली. तरीही दाद न मिळाल्याने तन्वर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. मात्र, त्यांच्या पाठीशी फारसे कोणी उभारले नाही. मुख्यमंत्री खट्टर यांनी "नो एन्ट्री' म्हणत त्यांना भाजपमध्ये प्रवेश नाकारला. तन्वर यांच्या जाण्यामुळे काँग्रेसला दलित मतांचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस हरियानाची लढाई हुडा यांच्या जिवावरच लढत आहे. हुडा हे जाटांचे नेते असून, काँग्रेस उमेदवारांच्या यादीत त्यांच्या साठ समर्थकांचा समावेश आहे. रणजीत सुरजेवाला यांचे पाच समर्थक, कुलदीप बिश्‍नोई यांचे चार, किरण चौधरी यांच्या तीन,तर अशोक तन्वर यांच्या दोन समर्थकांना उमेदवारी मिळाली.

लोकदलात दुफळी, आमदारांची पळापळ
इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौताला व त्यांचा मुलगा अजय यांना तुरुंगवास झाल्यानंतर हा पक्ष कोसळत गेला. लोकदलाचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अभय चौताला आणि दुष्यंत चौताला यांच्याशी असलेला वाद विकोपाला गेला. ओमप्रकाश चौताला यांनी थोरला मुलगा अजय व नातू दुष्यंत यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर, दुष्यंत यांनी जननायक जनता पक्ष (जेजेपी) स्थापना केली. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी ताकद आजमावली, तेव्हा जेजेपीला पाच टक्के मते, तर लोकदलाला दोन टक्के मते मिळाली. लोकदलातील घराणेशाहीतील वादाचा सर्वांधिक फायदा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला झाला. लोकदलाच्या 19 आमदारांपैकी 11 जण भाजपमध्ये, तर चौघेजण जेजेपीमध्ये गेले. लोकदलाने बहुतेक सर्व जागांवर उमेदवार उभे केले असले, तरी त्यामध्ये अभय चौताला यांच्यासह दोनच विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 dnyaneshwar bijale writes blog about haryana assembly election bjp