कानपूर चकमकीनंतर कसे पळाले; विकास दुबेच्या सहकाऱ्याने दिली महत्वाची माहिती

सूरज यादव
गुरुवार, 9 जुलै 2020

गँगस्टर विकास दुबेनं मध्य प्रदेशातील उज्जैन इथं आज पोलिसांसमोर नाट्यमयरित्या शरणागती पत्करली.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील कानपूर इथं गुंडांसोबत झालेल्या चकमकीत 8 पोलिस हुतात्मा झाले होते. या प्रकरणातील फरार असलेला गँगस्टर विकास दुबेनं मध्य प्रदेशातील उज्जैन इथं आज पोलिसांसमोर नाट्यमयरित्या शरणागती पत्करली. दरम्यान, गुरुवारी पहाटे उत्तर प्रदेश पोलिसांच्या चकमकीत विकास दुबेचा सहकारी प्रभात मिश्रा चकमकीत ठार झाला. प्रभात मिश्राने त्याआधी चौकशीत महत्वाची माहिती सांगितली होती. प्रभातने पोलिसांना सांगितलं होतं की, गेल्या शुक्रवारी कानपूरमध्ये हल्ला झाल्यानंतर सर्वांनी काय केलं. त्याने पोलिसांना घटनेनंतर विकास दुबेच्या हालचालींची माहितीसुद्धा दिली. आपल्याकडून चूक झाल्याचंही प्रभातने चौकशीवेळी सांगितलं. 

प्रभातने पोलिसांना सांगितलं की, विकास दुबे, अमर दुबेसह घटनेनंतर कानपूरजवळ शिवनी इथं पोहोचले होते. तिथं दोन दिवस राहिले. त्यानंतर एका मित्राची गाडीने औरेयातील एका पेट्रोल पंपापर्यंत आले. तिथून तिघे एका बसने दिल्लीतील बदरपूर इथं पोहोचले. त्यानंतर एक दिवस हॉटेलमध्ये राहिले. तिथून फरीदाबादमधील अंकुर मिश्राच्या घरी पोहोचले. विकास तिथं पोहोचणार आहे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र पोलिस छापा टाकण्याआधीच विकास तिथून निसटला. 

फरीदाबादमधून निसटल्यानंतर विकासच्या मागावर पोलिस होते. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मास्क आणि गमछा घातलेला असल्यानं रस्त्यात त्याला कोणीही ओळखू शकलं नाही. दिल्ली-एनसीआरमध्ये विकासचा शोध सुरू होता. पोलिसांना दाट संशय होता की तो दिल्ली - एनसीआरमध्ये लपून बसला आहे. यासाठी दिल्ली पोलिसांनाही अलर्ट करण्यात आलं होतं. विकास मंगळवारी फरीदाबादमध्ये एका हॉटेलमध्ये होता. सीसीटीव्हीमध्ये तो कैदही झाला होता. तिथंही पोलिस पोहोचण्याआधी तो पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. फरीदाबादमध्ये प्रभात मिश्रासह आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं. 

पाहा Video : 'होय मीच विकास दुबे, कानपूर वाला'; काय घडलं उज्जैनच्या मंदिरात?

विकासच्या हालचालींची माहिती दिलेल्या प्रभात मिश्राला पोलिस गुरुवारी ट्रान्झिट रिमांडवर कानपूरला नेत होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत गोळी लागून प्रभातचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची गाडी पंक्चर झाली. पंक्चर काढत असताना प्रभातने एका पोलिस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्वर हिसकावून घेत पोलिसांवरच गोळीबार सुरु केला. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांच्या गोळीबारात प्रभात ठार झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vikas dube movement after Kanpur encounter information from prabhat mishra in police inquiry