राहुल गांधींना भेटून मुलीचा आनंद गगनात मावेना; VIDEO ने नेटकऱ्यांची जिंकली मने

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

या व्हायरल व्हिडीओमधील निखळ लाघवीपणाने मोठ्या प्रमाणावर लोकांची वाहवा मिळत आहे.

पुदुच्चेरी : पुदुच्चेरीला विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान कॉंग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी पुदुच्चेरीत दाखल झाले. तिथे त्यांनी मच्छीमारांशी संवाद साधला. तसेच भारतीदसन कॉलेज फॉर विमेनच्या मुलींशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत मांडलं. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. तसंच लोकांची मने जिंकून घेत आहे. या व्हिडीओमधील निखळ लाघवीपणाने मोठ्या प्रमाणावर लोकांची वाहवा मिळत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका शाळकरी मुलीला भेटताना दिसत आहेत. राहुल गांधींची सही घेण्यासाठी आलेल्या मुलीचा उत्साह पाहून राहुल गांधी तिच्याशी हस्तांदोलन करताना आणि निर्विकारपणे मिठी मारताना दिसत आहेत. तसेच तिच्या सोबत फोटो काढताना दिसत आहेत. यामुळे ती मुलगी आणखीनच उत्साही होताना दिसत आहे. या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत. 

राहुल गांधींनी या दौऱ्यादरम्यान केंद्र सरकारवर टीका देखील केली आहे. त्यावेळी ते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कृषी कायदे तयार करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. तुम्ही समुद्राचे शेतकरी आहात, म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे, असे त्यांनी नमूद केले. जर जमिनीवरची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीत मंत्रालय असू शकते तर समुद्राच्या शेतकऱ्यांचे का होऊ शकत नाही. या वेळी राहुल गांधी यांनी मच्छीमारांसाठी विमा, निवृत्ती वेतनासह अन्य सुविधा देण्याची मागणी केली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या पुदुच्चेरी दौऱ्यापूर्वीच कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वीच चार आमदारांनीही राजीनामे दिले. त्यामुळे पुदुच्चेरीत सत्तारुढ कॉंग्रेस सरकार अल्पमतात आली आहे. येत्या मे महिन्यात विधानसभा निवडणुक होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viral video of rahul gandhii with a enthusiastic girl in Bharathidasan College for Women Puducherry