विकास दुबेचा एनकाऊंटर पूर्वनियोजित? न्यायालयात दाखल झाली होती याचिका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जुलै 2020

कानपुर एनकाऊंटरमध्ये मारला गेलेला कुख्यात गुंड विकास दुबे प्रकरणी शुक्रवारीच सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत पोलिसांच्या भूमिकेची चौकशी आणि विकास दुबे याचा एनकाऊंटर होण्याची शंका व्यक्त करण्यात आली होती.

नवी दिल्ली- कानपुर एनकाऊंटरमध्ये मारला गेलेला कुख्यात गुंड विकास दुबे प्रकरणी शुक्रवारीच सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत पोलिसांच्या भूमिकेची चौकशी आणि विकास दुबे याचा एनकाऊंटर होण्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याचिका वकील घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केली होती. याचिकाकर्ता वकीलने आजच यावर सुनावणी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. पण, त्याआधीच विकास दुबेचा एनकाऊंटर झाला आहे.

सरकार ऐवजी गाडी पलटी झाली, माजी मुख्यमंत्र्यांचा योगी सरकारवर थेट आरोप
वकीलांनी आपली बाजू मांडत असं म्हटलं आहे की, माध्यमातून आलेल्या बातम्यांनुसार विकास दुबे याने स्वत: महाकाल मंदिराच्या रक्षकांना आपण कानपुरचा विकास दुबे असल्याचं सागितलं होतं. दुबे याला पकडण्यात आलं नाही, तर त्याने एनकाऊंटरपासून वाचण्यासाठी स्वत:ला अटक करुन घेतली आहे. यूपी पोलिस त्याचा एनकाऊंटर करतील अशी शंका याचिकेत व्यक्त करण्यात आली होती.

या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली सीबीआईद्वारे करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ज्या प्रकारे पोलिस विकास दुबेचं घर, शॉपिंग मॉल आणि गाड्या फोडत आहेत त्यानुसार पोलिसांवरही एफआयआर दाखल केली जावी. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एक निश्चित कालखंड ठरवला जावा, अशी मागणी याचिकाकर्ता वकील उपाध्याय यांनी केली होती.

विकास दुबेच्या हत्येप्रकरणी अनेकांनी प्रतिक्रिया देत हा बनाव असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी या मुद्द्यावरुन योगी सरकारला लक्ष्य केलं आहे. गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे.

नेपाळची हिंमत वाढतेय; भारताविरोधात उचललं आणखी एक पाऊल
दरम्यान, कानपूरमध्ये एका अधिकाऱ्यासह 8 पोलिसांची हत्या केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेला मध्य प्रदेशमधील उज्जेनमधून उत्तर प्रदेशच्या कानपूरला नेण्यात येत होते. तो ज्या वाहनात होता त्या वाहनाला अपघात झाला. यावेळी त्याने पोलिसांकडील हत्यार हिसकावून घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर जखमी झालेल्या विकास दुबेला रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. यापूर्वी दुबेचा सहकारी असलेल्या प्रभातसह अन्य काही जणांचा पोलिसांनी खात्मा केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Was Vikas Dubeys encounter pre-planned The petition was filed in the court