राजम्मांना भेटताच राहुल गांधी गहिवरले

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 जून 2019

तब्बल पाच दशकांपूर्वी ज्या हातांनी तान्हुल्या राहुलबाबाला स्पर्श केला, तेच प्रेमळ हात आज पुन्हा पाहताच कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गहिवरले.

वायनाड : तब्बल पाच दशकांपूर्वी ज्या हातांनी तान्हुल्या राहुलबाबाला स्पर्श केला, तेच प्रेमळ हात आज पुन्हा पाहताच कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गहिवरले. ते साल होते 1970चे. गांधी कुटुंबामध्ये पुत्ररत्न जन्मला, त्या वेळी दिल्लीतील होली क्रॉस रुग्णालयामध्ये चिमुकल्या राहुलबाबाची देखभाल करणाऱ्या परिचारिकांमध्ये राजम्मा यांचाही समावेश होता.

राहुल यांच्या आजी आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे रुग्णालयातील परिचारिकांसोबत विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. यामुळे राजम्मा याही अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबाचा भाग बनल्या होत्या. निवृत्तीनंतर राजम्मा या केरळमध्ये वायनाड येथे वास्तव्यास आल्या. त्या दिल्लीपासून दूर गेल्या, तरीसुद्धा नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. राहुल यांनी या खेपेस केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. अमेठीचा हक्काचा बालेकिल्ला गमाविल्यानंतरदेखील वायनाडमधून मात्र ते विजयी झाले.

वायनाडवासीयांचे आभार मानण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांची आज राजम्मांशी भेट झाली. राहुल यांचा जन्म झाला तेव्हा त्यांना पहिल्यांदा कुशीत घेतले ते राजम्मांनीच. आज प्रत्यक्ष भेटीदरम्यान राजम्मांनी हा प्रसंग कथन करताच राहुल अक्षरश: गहिवरले आणि त्यांनी राजम्मांना प्रेमाने आलिंगन दिले.

तब्बल 49 वर्षांनंतर राहुल यांची भेट घेताना राजम्मांनाही अश्रू आवरता आले नाहीत. विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला यांनी या हृद्य भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Wayanad Rahul Gandhi meets nurse who was present during his birth