आम्हाला जनावरांचा डॉक्‍टर नको; युवक काँग्रेसच्या अध्यक्षांची विनंती

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

"काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार नाही, आता दुसरा नेता निवडा,' असे बजावणाऱ्या राहुल गांधींना "रुग्णशय्येवर असलेल्या कॉंग्रेसला ऍलोपॅथी डॉक्‍टरची गरज असताना जनावरांचा डॉक्‍टर का देता?' अशी विचारणा आजच्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आल्याचे कळते. 

नवी दिल्ली : "काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार नाही, आता दुसरा नेता निवडा,' असे बजावणाऱ्या राहुल गांधींना "रुग्णशय्येवर असलेल्या कॉंग्रेसला ऍलोपॅथी डॉक्‍टरची गरज असताना जनावरांचा डॉक्‍टर का देता?' अशी विचारणा आजच्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आल्याचे कळते. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर 25 मे रोजी झालेल्या कार्यकारिणी बैठकीत राहुल गांधी संतप्त आणि अन्य नेते स्तब्ध होते. त्या तुलनेत आजच्या बैठकीत अन्य नेते राहुल गांधी यांचा राजीनामा नाकारण्यासाठी आक्रमक आणि स्वतः राहुल इतरांचे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत, अशी परिस्थिती होती.

कार्यकारिणीतील सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीच्या सुरवातीलाच उपस्थित नेत्यांनी राहुल यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असा पवित्रा घेतला. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींसह अन्य ज्येष्ठ नेते बैठकीत सहभागी झाले होते. 

युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी तर पक्षाला रुग्णाची उपमा देताना, पक्षाला बरे करण्यासाठी ऍलोपॅथी डॉक्‍टरची आवश्‍यकता असून तुम्ही व्हेटर्नरी (जनावरांचा) डॉक्‍टर का देत आहात, असे म्हटल्यामुळे जोरदार हशा पिकला. सोनिया, राहुल यांनाही हसू आवरले नाही. मात्र, राहुल गांधींनी राजीनामा मागे घेणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. आपल्याला काही झाले असते तर पक्षाने नवा नेता निवडला नसता काय, असा प्रश्‍न राहुल यांनी करताच बैठकीत शांतता पसरली होती. 

अर्थात, या वेळी सोनिया गांधींनी केलेल्या सवालामुळे गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आलेल्या जुन्या-नव्या नेत्यांची चांगलीच बोलती बंद झाली. राजीनामा मागे घेण्याचा राहुल यांना आग्रह सुरू होताच सोनिया गांधींनी "तुमच्यापैकी बरेच जण अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत,' असे म्हणताच चपापलेल्या या नेत्यांनी आपली इच्छा नाही असे म्हणत केलेली सारवासारवही उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती.

अखेरीस सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी, नव्या नेतृत्वाची निवड लोकशाही प्रक्रियेनुसार व्हावी यासाठी आपण बैठकीत सहभागी नसल्याचे जाहीर केले. बैठकीतून बाहेर पडताना सोनिया गांधींनी पत्रकारांशी बोलताना निवड प्रक्रियेपासून लांब राहण्याच्या कारणाचा खुलासा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We do not want a veterinarian Request by Shrinivas b v