कोरोनाकाळात भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत ३५ टक्के वाढ; लाखोंनी गमावला रोजगार 

वृत्तसंस्था
Wednesday, 27 January 2021

लॉकडाउनच्या काळात भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत ३५ टक्क्याने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून भारतातील प्रमुख १०० अब्जाधीशांच्या दौलतीत १२ लाख ९७ हजार ८२२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाव्हायरसच्या साथीने जगभरातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली. हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार हिरावला गेला. यामुळे भारतासह बहुतेक सर्व देशांमध्ये उत्पन्नातील असमानता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम शिक्षण, आरोग्य आणि चांगले आयुष्य जगण्याच्या अधिकारांवर गदा आली. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून भारतातील प्रमुख १०० अब्जाधीशांच्या दौलतीत १२ लाख ९७ हजार ८२२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही रक्‍कम एवढी आहे की, यातून देशातील १३.८ कोटी गरीब जनतेला प्रत्येकी ९४ हजार ४५ रुपयांचा धनादेश मिळू शकेल. 

कोरोनाकाळात भारतातील आर्थिक विषमतेकडे लक्ष वेधणारी ही आकडेवारी विना - नफा संस्था असलेल्या ‘ऑक्सफाम’ने एका अहवालाद्वारे सोमवारी जाहीर केली. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित केलेल्या जागतिक आर्थिक मंचा (डब्ल्यूईएफ)च्या परिषदेत ‘द इनइक्वॉलिटी व्हायरस’ या शीर्षकाचा हा अहवाल मांडण्यात आला. कोरोनामुळे एकाच वेळी प्रत्येक देशात आर्थिक विषमतेची दरी रुंदावली. यासंबंधीची माहिती जतन करण्यास सुरुवात झाल्यापासूनच्या शतकात प्रथमच असे घडत आहे, अशी नोंद ‘ऑक्सफाम’ने केली आहे. लॉकडाउनच्या काळात भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत ३५ टक्क्याने वाढ झाली आहे. याच वेळी ८४ टक्के जनतेवर उत्पन्न गमावण्याची वेळ आली तर केवळ एप्रिल २०२० मध्ये नोकरी गमावलेल्यांची संख्या प्रत्येक तासाला १. ७ लाख एवढी प्रचंड होती, असे यात नमूद केले आहे. 

अंबानींएवढी संपत्ती कमावण्यासाठी दहा हजार वर्षे 
‘‘रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कोरोनाकाळात एक तासात जेवढी कमाई केली तेवढे मिळविण्यासाठी अकुशल कामगाराला दहा हजार वर्षे लागतील,’’ असे सांगत ‘भारतातील असमानतेत वाढीच्या विदारक वास्तवावर ‘ऑक्सफाम’ने प्रकाश टाकला आहे. ऑगस्ट महिन्यात मुकेश अंबानी हे जगातील सर्वाधिक चौथे धनाढ्य व्यक्ती असल्याचे जाहीर झाले होते. ऑगस्टच्या आधी व नंतरच्या महिन्यात लाखो स्थलांतरितांचा रोजगार हिरावला गेला. कोरोनामुळे संपूर्ण जगात कडक लॉकडाउन असल्याने रोजगाराबरोबरच पैसा, अन्न व निवारा या मूलभूत हक्कांपासूनही स्थलांतरितांना वंचित राहावे लागले, असे अहवालात म्हटले आहे. 

कोरोनामुळे भारतामधील बाधित क्षेत्रे 

रोजगार 

-असंघटित रोजगार क्षेत्रात असलेल्या ७५ टक्के जनतेला सर्वाधिक फटका. 
- १२ कोटी २० लाख रोजगारावर गदा. 
- अशा क्षेत्रात घरून काम करण्याची संधी फारशी नाही. 
- बांधकाम, कारखाने आदी ठिकाणी हंगामी काम करणारे चार ते पाच कोटी मजूर भरडले गेले. 

शिक्षण 
- गेल्या वर्षभरात प्रत्यक्षकडून ऑनलाइन असा शिक्षणाचा प्रवास. 
- शैक्षणिक क्षेत्रातील डिजिटल स्थलांतराने असमानतेत भर. 
- ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या कंपन्यांची भरभराट. 
- दुसऱ्या बाजूला देशात २० टक्के गरिबांपैकी तीन टक्के कुटुंबांमध्ये संगणक उपलब्ध तर नऊ टक्के घरांत इंटरनेटची सोय. 

आरोग्य 
(आर्थिक सामाजिक किंवा सामाजिक क्षेत्रातील माहिती भारताकडून मिळाली नसल्याने कोरोनाचा प्रसार झालेल्या विविध समुदायांचे विश्‍लेषण करणे कठीण असल्याचे अहवालात म्हटले आहे.) 
- कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेला भारत हा जगातील दुसरा देश 
- गरीब, उपेक्षित आणि असुरक्षित समाजात कोरोनाच्या संसर्गाचा वेग जास्त. 
- गरीब, दाट लोकवस्तीत, सार्वजनिक स्वच्छतागृह आणि नळकोंडाळे असलेल्या भागांत प्रसार सर्वाधिक. 
- देशातील २० टक्के गरिबांपैकी सहा टक्के घरांमध्येच स्वतंत्र स्वच्छता सुविधा. 

स्त्री- पुरुष भेद 
- कोरोना साथीत लिंग असमानता वाढीस. 
- महिलांमधील बेरोजगारीचा दर १५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत पोचला. 
- महिलांमधील बेरोजगारीमुळे भारतातील एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) २१८ अब्ज डॉलरचे नुकसान. 
- लॉकडाउनमध्ये ज्या महिलांच्या नोकऱ्या सुरक्षित राहिल्या तरी त्यातील ३३ टक्के जणींना वेतन कपातीला सामोरे जावे लागल्याचे ‘इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडिज ट्रस्ट’च्या पाहणीतील निरीक्षण. 
-गरीब महिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या. 
- कुटुंब नियोजन विभागाचे कामकाज बंद असल्याने २९ लाख ५० हजार अकाली प्रसूती, १८ लाख गर्भपात आणि दोन हजार १६५ मातांचे मृत्यू झाले. 
- महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ. 
- कौटुंबिक हिंसाचारात गेल्या १२ महिन्यांत ६० टक्के वाढ नोंदविली. 

कोरोनाव्हायरसच्या साथीने सर्वांना समान पातळीवर आणल्याचे सुरुवातीला दिसले तरी लॉकडाउनच्या अंमलबजावणीनंतर समाजात असमानतेची दरी अधिक रुंदावल्याचे दिसते. 
अमिताभ बेहर, मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑक्सफाम, भारत 

श्रीमंत व गरिबांमधील वाढत गेलेली असमानता ही कोरोना विषाणूप्रमाणेच घातक ठरत आहे. 
ग्रॅब्रिएला बुचर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यकारी संचालक, ऑक्सफाम 

जगभरात (१८ मार्च ते ३१ डिसेंबर २०२०पर्यंत) 

३.९ लाख कोटी डॉलर 
श्रीमंतांच्या संपत्तीतील वाढ 

५४० अब्ज डॉलर 
पहिल्या दहा अब्जावधींच्या संपत्तीतील वाढ 

२० ते ५० कोटी 
नागरिक गरिबीत लोटले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wealth of the rich in India increased by 35 percent during the Corona period