esakal | देशातील गर्भश्रीमंत मंडळींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी केले सेफ्टी बबल्स तयार

बोलून बातमी शोधा

Ambani and Adani
देशातील गर्भश्रीमंत मंडळींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी केले सेफ्टी बबल्स तयार
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाच्या जीवघेण्या संकटासमोर सरकार आणि आरोग्य यंत्रणेने हात टेकले असताना देशातील गर्भश्रीमंत मंडळींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बबल्स तयार केले आहेत. अनेकांनी संसर्गाचा धोका लक्षात घेऊन बड्या शहरांमधून आधीच स्थलांतर केले आहे तर काहीजण या संकटाच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांसाठी आधार बनले आहेत. समाज कार्यामध्येही ते भरीव योगदान देताना दिसतात.

इन्फोसिसचे संस्थापक सदस्य असणाऱ्या क्रिस गोपालकृष्णन यांनी तर मी माझे कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांसोबत स्वत ःला घरामध्ये कोंडून घेतले असल्याचे सांगितले. गोपालकृष्णन यांच्या कुटुंबीयांनी बाहेरशी असणारा संबंध पूर्णपणे तोडून टाकला असून आता घरामध्ये तयार होतील तेवढेच पदार्थ ते खातात. ‘इन्फोसिस’चे अन्य एक संस्थापक नंदन निलेकणी यांनीही तोच कित्ता गिरवला असून सध्या त्यांचेही वर्क फ्रॉम होम सुरू आहे.

अनेक छोट्या उद्योगपतींनी कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट येण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये आश्रय घेतल्याचे आढळून आले आहे. प्रायव्हेट जेटच्या माध्यमातून ही मंडळी केव्हाच देशाबाहेर गेली आहेत.

हेही वाचा: देशात कोरोनानं २ लाखांहून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्री म्हणतात भारताचा मृत्यूदर कमीच!

अंबानी कुटुंबीय गुजरातमध्ये

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत गुजरातमधील जामनगरला गेले असून गौतम अदानी त्यांचे पुत्र करण आणि कुटुंबीयाने अहमदाबाद शहराबाहेर असलेल्या बंगल्यात आश्रय घेतला आहे. जामनगर येथील अंबानीच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पातूनच अनेक राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो आहे.

अदानींकडून मदतीचा हात

देशातील सर्वांत मोठी बंदरे ऑपरेट करणारा अदानी उद्योगसमूह अन्य देशांतून ऑक्सिजन आयात करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि भारतातील उद्योगांनी कोरोनाकाळामध्ये मदतीचा हात पुढे केला असून ऑक्सिजन, अन्य वैद्यकीय संसधानांचा पुरवठा केला जात आहे.

‘बायजू’चा सीईओ फंड

स्टार्टअप क्षेत्रातील दिग्गज रवींद्रन बायजूच्या अकरा हजार कर्मचाऱ्यांसाठी आधार बनले आहेत. कर्मचाऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीत वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी म्हणून कंपनीने वेगळ्या सीईओ फंडची स्थापना केली आहे. स्मार्टफोनची उत्पादक कंपनी डिक्सन टेक्नोलॉजीस लि.चे संस्थापक सुनील वाचानी यांनी घरातूनच काम करायला सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा मिळाव्यात म्हणून एक कमांड सेंटरदेखील उभारले आहे.