esakal | 'लशींचा साठा संपल्यानंतर देशात विक्रीस परवानगी'

बोलून बातमी शोधा

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान केंद्र सरकारने दि. 1 मे पासून 18 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लशींची खुल्या बाजारात विक्री करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवानगी दिली.

'लशींचा साठा संपल्यानंतर देशात विक्रीस परवानगी'

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

भगनानगोला/मुर्शिदाबाद (पश्‍चिम बंगाल) - कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लशींची खुल्या बाजारात विक्री करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवानगी दिली. मात्र त्याआधीच त्यांनी विदेशात लशी पाठविल्‍या असल्याने भारतात साठाच संपलेला आहे,’’ अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केली.

निवडणूक सभेत बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि पश्‍चिम बंगालसारखी राज्ये पुरेशा प्रमाणात लस मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असताना पंतप्रधानांनी प्रतिमा संवर्धनासाठी अन्य देशांत लशींची निर्यात केली. कोरोनावरील लस खुल्या बाजारात उपलब्ध होईल, अशी घोषणा मोदी यांनी काल केली. पण कुठे आहे खुला बाजार, कोठे लस उपलब्ध आहे, असा सवाल करीत देशातील लशींचा मोठा साठा तुम्ही याआधीच विदेशात पाठविला आहे, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा: पंतप्रधनांच्या आवाहनावर नवाब मलिकांनी केली 'ही' मागणी; म्हणाले...

‘‘मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार हे ‘अकार्यक्षमतेचे प्रतीक’ आहे. त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे आपल्याला प्रचंड तुटवडा जाणवत आहे, असे बॅनर्जी म्हणाल्या. कोलकता, उत्तर २४ परगणा आणि असनसोल पट्ट्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून लस, औषधांच्या मर्यादित साठ्यासह राज्य सरकार कोरोनाला तोंड देत आहे. बंगालमधील कोरोना स्थिती नियंत्रणात असला तरी संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. पण लोकांनी घाबरून जाऊ नये. आपण पुन्हा कोरोनाला हरवू, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या...

- कोरोनावर उपाय योजण्याऐवजी बंगालमधील निवडणुकीचे डावपेच आखण्यात केंद्रातील नेतृत्व मग्न

- मुर्शिदाबाद व माल्डा येथील गंगा नदीची धूप थांबविण्यासाठी केंद्रीय धोरणाची गरज

-रामनवमीला दंगल घडविण्याचे कारस्थान

- काँग्रेस व डाव्या पक्षांचे उमेदवार म्हणजे भाजपचा दुसरा चेहरा असल्याने त्यांना मत देऊ नका