esakal | 'मोदींची वाढतेय फक्त दाढी, स्क्रू झालाय ढिला'; मतदानाच्या पूर्वसंध्येला ममतांचा मोदींवर हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

mamata banerjee narendra modi

आज शुक्रवारी झालेल्या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

'मोदींची वाढतेय फक्त दाढी, स्क्रू झालाय ढिला'; मतदानाच्या पूर्वसंध्येला ममतांचा मोदींवर हल्लाबोल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता : देशातील पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तमीळनाडू, आसाम आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. यातील सर्वाधित चुरशीची लढत पहायला मिळत आहे ती पश्चिम बंगालमध्ये! याठिकाणी भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावत प्रचारात जोर लावला आहे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी भाजपला जोरदार टक्कर देत आहेत. आज शुक्रवारी झालेल्या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हा हल्ला करताना त्यांनी थेट मोदींची दाढी खेचण्याचाच एकप्रकारे प्रयत्न केला आहे. 

ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की, या ठिकाणी उद्योग क्षेत्राचा विकास खुंटला आहे. मात्र, दुसरीकडे फक्त त्यांची (पंतप्रधान नरेंद्र मोदी) दाढी वाढतच आहे. ते कधी स्वत:ला स्वामी विवेकानंद समजतात तर कधी स्टेडीयमलाच स्वत:चं नाव देतात. मला वाटतंय त्यांच्या डोक्यात काहीतरी बिघडलंय. त्यांचा स्क्रू ढिला झाला आहे, असं मला वाटतंय. असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. 

हेही वाचा - 'साडीत पाय दिसणं बरं नव्हे'; ममतांबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यानं दिलं स्पष्टीकरण

उद्या म्हणजेच 27 मार्चपासून पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आठ टप्प्यातील मतदानातील पहिला टप्पा सुरु होणार आहे. 29 एप्रिल रोजी शेवटचा टप्पा पार पडणार असून या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. ममता बॅनर्जी यावेळची निवडणूक नंदीग्राममधून लढवत आहेत. एकेकाळी त्यांच्याच पक्षातील विश्वासार्ह सहकारी असलेल्या सुवेंदु अधिकारी यांनी या ठिकाणाहून भाजपच्या वतीने ममता बॅनर्जी यांना आव्हान दिलं आहे. 

दिलीप घोष यांचं वादग्रस्त विधान

पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या साडीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. घोष यांनी नाव न घेता टीका केली असली तरी त्याचा संबंध ममता बॅनर्जी यांच्या नावाशी असल्याचं स्पष्ट समजत आहे. दिलीप घोष यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी नाराजीचा सूर ओढला आहे. दिलीप घोष पुरुलियामधील प्रचारसभेत बोलताना म्हटलं होतं की,  'प्लास्टर काढल्यानंतर देखील त्या बँडेज लावलेला पाय दाखवत आहेत, त्यांनी साडी नेसली आहे आणि एक पाय झाकलेला आहे पण दुसरा नाही. अशी साडी कुणी नेसलेलं मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. जर त्यांना त्यांचा पाय दाखवायचाच असेल, तर त्यांनी बर्मुडा घालावा. त्यामुळे अधिक व्यवस्थित दिसू शकेल.' दिलीप घोष यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे.