esakal | कोरोना वाढत असल्याने राहुल गांधींचा मोठा निर्णय; मोदी-ममता अनुकरण करणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul gandhi

कोरोना वाढत असल्याने राहुल गांधींचा मोठा निर्णय; मोदी-ममता अनुकरण करणार का?

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील टप्प्यांतील मतदानासाठी प्रचार सभा न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं सांगत त्यांनी सर्व सभा रद्द केल्या आहेत. तसेच त्यांनी राजकीय पक्षांना यावर विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ट्विट करुन राहुल गांधी यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, कोरोनाची स्थिती पाहता पश्चिम बंगालमधील सर्व सार्वजनिक रॅली स्थगित करत आहे. मी सर्व राजकीय नेत्यांना सल्ला सल्ला देऊ इच्छितो की, सार्वजनिक रॅलींच्या परिणामवर खोलात जाऊन विचार करायला हवा. मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येणे देशातील जनतेसाठी धोक्याचे आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून 2 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

हेही वाचा: कोरोना, राजकारणी आणि सामान्य माणूस!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. राजकीय पक्ष प्रचारसभा आयोजित करत आहेत. या सभांना हजारोंच्या संख्येने लोक जमा होत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अशा सभा घेतल्या जाव्यात का, असा प्रश्न पडतोय. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या सभांसाठी हजारोंची गर्दी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांवर काँग्रेसने टीका केली आहे. कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी भाजप नेते संसर्गाच्या पसरण्यास हातभार लावत असल्याची टीका काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केलीये.

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यामध्ये मतदान पार पडत आहे. 30 एप्रिलपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहील. आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदान पार पडले असून 22 एप्रिलला सहाव्या टप्प्यातील मतदान होईल. 2 मे रोजी पाच राज्यातील निवडणुकींचा निकाल लागणार आहे. यात पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरी या राज्यांचा समावेश आहे. विशेष करुन पश्चिम बंगालमधील निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

राहुल गांधी यांनी रविवारी एक ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. मोदींनी आपल्या सभेत जनतेला संबोधित करताना म्हटलं होतं की, 'त्यांची जिथंपर्यंत नजर जात आहे. तिथंपर्यंत लोक दिसत आहेत'. मोदींच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट करुन म्हटलं होतं की, आजार आणि मृत्यू झालेल्यांची इतकी गर्दीही पहिल्यांदा पाहात आहे.