ममता दिदींच्या कार्यकर्त्यांनो सुधरा, नाहीतर स्मशानात पाठवू, भाजप नेत्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

आतापर्यंत ममता बॅनर्जींना कायद्यानुसार सरकार चालवण्याचा भाजपकडून सातत्याने सल्ला दिला जातो. परंतु, त्यांचे प्रदेशाध्यक्षच आता कायदा हातात घेण्याची भाषा बोलत आहेत.

कोलकाता- पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांनी व्यवस्थित राहा, नाहीतर हिंसाचार होईल, असा इशारा दिला आहे. गुंडगिरी करणाऱ्या ममता दिदींच्या कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की, त्यांनी सहा महिन्यांत सुधारावे. नाहीतर त्यांचे हात, पाय मोडू. घरी जाण्याऐवजी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. तर तुमच्या करामती वाढल्या तर मग स्मशानात पाठवू, अशी धमकीच त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. 

आतापर्यंत ममता बॅनर्जींना कायद्यानुसार सरकार चालवण्याचा भाजपकडून सातत्याने सल्ला दिला जातो. परंतु, त्यांचे प्रदेशाध्यक्षच आता कायदा हातात घेण्याची भाषा बोलत आहेत. दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींना हिटलरची उपमा दिली आहे. 

हेही वाचा- पोटगी अशी ठरवू नका की ज्यामुळं पती गरीब होईल- सुप्रीम कोर्ट

'हिंदुस्थान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, घोष यांनी रविवारी हल्दिया येथील एका रॅलीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. 'साडी घातलेल्या हिटलर' असा आरोप त्यांनी केला. त्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकणार असल्याचा दावाही केला. 

हेही वाचा- बिग बास्केटच्या 2 कोटी ग्राहकांचा डेटा लीक

दरम्यान, 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरु आहे. भाजपने राज्यातील 294 जागांपैकी 200 जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. मागील आठवड्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात पश्चिम बंगालचा दौरा केला होता. 

हेही वाचा- कोरोना कृती समितीवर भारतीय वंशाचे मूर्ती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: west bengal bjp president dilip ghosh warns tmc party workers mamata banerjee