
West Bengal News : मृतदेह खांद्यावरून नेला!
जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) : देशभरात सर्वत्रच वैद्यकीय सोयी- सुविधांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाऊ लागला आहे. याचा सर्वात मोठा फटका गरिबांना बसताना दिसतो. पश्चिम बंगालमध्ये रुग्णवाहिकेचे भाडे देणे परवडत नसल्याने एका व्यक्तीला स्वतःच्या आईचा मृतदेह खांद्यावरून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या घरी न्यावा लागला.
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. काही स्वयंसेवी संस्थांनी वेळीच धाव घेतल्याने संबंधित व्यक्तीला मदत मिळू शकली. येथील रामप्रसाद दिवाण यांच्या सत्तर वर्षांच्या आईला मागील काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. यानंतर रामप्रसाद यांनी जलपाईगुडी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आईला उपचारासाठी दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झाले.
दिवाण म्हणाले की, ‘‘ ज्या रुग्णवाहिकेतून मी आईला रुग्णालयात आणले होते त्यासाठी नऊशे रुपये मोजले होते पण घरी जाण्यासाठी तोच रुग्णवाहिकेचा चालक तीन हजार रुपयांची मागणी करत होता. एवढे भाडे देणे आम्हाला शक्य नव्हते. त्यामुळे रुग्णालयातील बेडशीटमध्ये मी आईचा मृतदेह गुंडाळला आणि तोच खांद्यावर घेऊन घरचा रस्ता धरला.’’
... तर सोय केली असती
रुग्णालयाचे निरीक्षक कल्याण खान यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आम्हाला या घटनेची माहिती मिळाली असती तर आम्ही निश्चितपणे त्यांच्यासाठी शववाहून नेणाऱ्या वाहनाची सोय केली असती. आम्ही नेहमीच अशाप्रकारची सोय उपलब्ध करून देतो. संबंधित कुटुंबाला याबाबतची माहिती नव्हती असे दिसते. लोकांनी रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती करून घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.