पश्‍चिम बंगालमध्ये गाव गाते राष्ट्रगीत

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

नदिया जिल्ह्यातील शाळेच्या उपक्रमाला ग्रामस्थांचा पाठिंबा

नदिया जिल्ह्यातील शाळेच्या उपक्रमाला ग्रामस्थांचा पाठिंबा

अभयनगर (पश्‍चिम बंगाल): शाळेत "जन गण मन' हे राष्ट्रगीत सुरू झाले, की असेल तसे उभे राहून त्याला मानवंदना देण्याची शिस्त अंगी बाणलेली असते. शालेय जीवनातील शिस्तीचे पालन पश्‍चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील एका लहानशा गावात आजही केले जात आहे. रोज सकाळी घड्याळाचे काटे 10 वाजून 50 मिनिटांची वेळ दर्शवू लागले, की सर्व ग्रामस्थ हातातील काम बाजूला ठेवून राष्ट्रगीत म्हणतात. अशा प्रकारे रोज 52 सेकंद गावातील कामकाज बंद असते. ही वेळ देशासाठी राखून ठेवली जाते. ग्रामस्थ घरात असोत वा गाडी, रिक्षा व सायकल चालवत असोत, किंवा पायी चालत असोत; 10 वाजून 50 मिनिटे झाली ते स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीत गायला सुरवात करतात. या विशिष्ट काळात अभयनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतात. त्यांचा आवाज ध्वनिक्षेपकावरून जवळील परिसरात ऐकविला जातो.

"अशा प्रकारे राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये देशाभिमान रुजण्यास मदत होते. म्हणूनच गावातील नागरिक कोठेही असले, तरी शाळेतील मुलांसोबत त्यांनी राष्ट्रगीत म्हणावे, अशा विनंती आम्ही केली होती. आमच्या विनंतीला मान देऊन ते या उपक्रमात सहभागी झाले आहेत,'' असे अभयनगर शाळेचे मुख्याध्यापक सफिकुल इस्लाम यांनी सांगितले. शाळेच्या इमारतीपासून 100 फूट दूर ध्वनिक्षेपक बसविलेला आहे. त्यावरील राष्ट्रगीत ऐकताना ग्रामस्थही त्यात आपला आवाज मिसळतात, असे ते म्हणाले.

ग्रामस्थांमध्ये समाधान
"मी आणि अन्य दोघे जण शेतातून काढलेले पीक घेऊन शाळेजवळून जात होतो, त्याचवेळी ध्वनिक्षेपकावर राष्ट्रगीत ऐकू येऊ लागले. त्यामुळे एका जागी थांबून आम्हीही ते म्हणू लागलो. हा अनुभव छान आहे,'' असे मत शेतकरी मयजुद्दीन विश्‍वास (वय 50) यांनी व्यक्त केले. चंपा बिबी (वय 26) या आपल्या दोन मुलींना शाळेत सोडायला येतात. मुलींच्या आग्रहाखातर मीही त्यांच्याबरोबर "जन गण मन' म्हणते आणि मगच घरी येते. हा शाळेने अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. अशीच प्रतिक्रिया शाळेत माध्यान्ह भोजन बनविणाऱ्या नरसिना बानू यांनीही व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: west bengal news school jan gan man national anthem