
थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 जयंतीनिमित्त शनिवारी प. बंगालमध्ये राजकीय मानापमान नाट्य रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कोलकता- थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 जयंतीनिमित्त शनिवारी प. बंगालमध्ये राजकीय मानापमान नाट्य रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहभागी झाल्या खऱ्या पण ऐनवेळी उपस्थितांमधून ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी करण्यात आल्याने त्या प्रचंड संतापल्या. पंतप्रधानांसमोरच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत परत आपल्या जागी जाऊन बसणे पसंत केले.
प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा!
तत्पूर्वी कोलकत्यामध्येच पदयात्रा काढत ममतांनी भाजपवर निशाणा साधला. आता निवडणुका जवळ आल्याने भाजपला नेताजी आठवत आहेत असा टोला त्यांनी लगावला. विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी आणि ममता व्यासपीठावर एकत्र आले होते पण उभय नेत्यांनी परस्परांशी बोलणे टाळले. जाहीरसभेत भाजपवर निशाणा साधणाऱ्या ममतादीदी पंतप्रधानांसमोर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
#WATCH | West Bengal: PM Narendra Modi at Victoria Memorial in Kolkata.
CM Mamata Banerjee and Governor Jagdeep Dhankhar are also present. #NetajiSubhashChandraBose pic.twitter.com/9l0ET4YZKL— ANI (@ANI) January 23, 2021
ममता काय म्हणाल्या
हा काही राजकीय कार्यक्रम नाही. सरकारी कार्यक्रमामध्ये शिष्टाचाराचे पालन होणे गरजेचे आहे. हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. कोलकत्यामध्ये हा कार्यक्रम घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे मी आभार मानते. पण एखाद्याला व्यासपीठावर बोलावून अपमानित करणे शोभा देत नाही. याचा विरोध करत मी आणखी काही जास्त बोलणार नाही. जय हिंद, जय बांग्ला.