
बद्रीनाथ (उत्तराखंड): देशातील कोरोनामुळे लॉकडाऊनची स्तिथी तसेच अति बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धाम गेल्या अनेक दिवसांपासून बंद ठेवण्यात आले होते. उत्तराखंड मधील प्रमुख धार्मिक स्थळ असणाऱ्या बद्रीनाथ धामचे आज शुक्रवारी पहाटे अनेक दिवसांनंतर दार उघडण्यात आले आहे. देशात लॉकडाऊन असल्यामुळे सध्या बद्रीनाथमध्ये कोणीही भाविक नाही. ह्या मंदिराचे दरवाजे उघडत असताना मंदिर परिसरात पूर्णपणे सोशल डिस्टंसिंगचे पालन करून मोजक्याच लोकांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. बद्रीनाथ धामाच्या प्रथेप्रमाणे पूजाअर्चा करून पहाटे 4.30 वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी बद्रिनाथ धामचे मुख्य पुजारी, धर्माधिकारी यांच्यासह मंदिराशी निगडीत केवळ 28 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिराला फुलांची सुंदर आरास करून सजविण्यात आले होते. मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावाने वेदपठण, मंत्रोच्चारांसह भगवान बद्रिच्या विशाल गाभाऱ्याचे दरवाजे आज पहाटे उघडण्यात आले.
मंदिर प्रशासनाने बदलला होता निर्णय:
याआधी टिहरी दरबारात पार पडलेल्या मंत्रोच्चाराच्या कार्यक्रमात मंदिर प्रशासनाने 30 एप्रिल रोजी सकाळी साडेचार वाजता मुख्य गाभाऱ्याचे दरवाजे उघडण्यात येतील असा निर्णय घेतला होता. परंतु, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बद्रीनाथ मंदिराच्या मंदिर प्रशासनाने दरवाजे उघडण्याची तारिख पुढे ढकलली होती. त्यानंतर आज 15 मे रोजी ब्रम्ह मुहूर्तावर दरवाजे उघडण्याचं मंदिर प्रशासनाकडून ठरविण्यात आलं . आज हा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात व शासनाच्या सर्व निंयमांचे पालन करून संपन्न व्हावा यासाठी मंदिर प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या होत्या.
लॉकडाऊन काळात प्रशासनाने कसा हटविला रस्त्यांवरील बर्फ:
उत्तराखंडमध्ये दरवर्षी अति बर्फवृष्टीमुळे अनेक भागात रस्त्यांवर बर्फ साचून त्या भागाचा संपर्क पूर्णपणे खंडित होत असतो. दरम्यान, मंदिर प्रशासनाकडून दरवाजे उघडण्याआधीच सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती. केदारनाथ धाम आणि बद्रीनाथ धाम दोन्ही ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवरील मोठ्या प्रमाणात साचलेला बर्फ हटवण्यात आला होता. यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मजुरांना रस्त्यावरील बर्फ हटवण्याच्या कामासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच रस्त्यांवरील बर्फ हटवत असताना काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचं पालनही करण्यात आलं होतं.
दरम्यान देशातील तसेच जगातील कोरोनाचा वाढत फैलाव रोखण्यासाठी आता बद्रीनाथाला साकडं घालण्यात आले असून आपला देश लवकरात लवकर कोरोनमुक्त व्हावा अशी इच्छा मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे. सध्या भारतात कोरोनाचे एकूण 82103 रुग्ण असून दिवसेंदिवस हा आकडा मोठ्याप्रमाणात वाढत चालला आहे. ज्या चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता त्या चीनला आज भारतातील कोरोना रुग्णांची संख्या मागे टाकणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.