Section 377 of IPC : संसदेने कलम ३७७ रद्द केले मात्र हा कायदा नेमका काय होता ? समलैंगिकता म्हणजे काय

समलैंगिकते संदर्भातील वाद-विवादांची लय नेहमीच दांभिकता आणि दुटप्पी मानसिकतेमुळे भरकटते.
Section 377 of IPC
Section 377 of IPC sakal
Updated on

Section 377 of IPC : समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारं भारतीय दंड संहितेचं कलम ३७७ सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच रद्द ठरवल होतं आता केंद्र सरकारने कलम रद्द करण्यात यावे असा कायद्यात बदल सुचवला आहे.

कायद्यातील कलम ३७७ रद्द केल्या मुळे समलिंगी समुदायाला मोठा दिलासा मिळाला असून सरकारच्या या निर्णयानंतर त्यांनी अंतर्गत जल्लोष सुरू केला असणार यात शंका नाही. समलैंगिकते संदर्भातील वाद-विवादांची लय नेहमीच दांभिकता आणि दुटप्पी मानसिकतेमुळे भरकटते.

सगळे धर्म समलैंगिक संबंधांकडे विकृत व्यभिचार किंवा पाप म्हणून पाहतात हे गृहीतकच मुळात चुकीचं आहे. ख्रिश्चन मिशनरी आणि कट्टरपंथी मुसलमान मौलवी यांचा भारतात प्रवेश होण्यापूर्वी हिंदूधर्मीय त्यांच्या कामजीवनाबद्दल बोलताना अवघडून जात नसत.

गुप्त काळात रचलेल्या वात्सायनलिखित कामसूत्रामध्ये देखणे पुरुष सेवक तसंच मालिश तसंच हजामत करणाऱ्या पुरुषांसह पुरुषांच्याच संबंधाचं तपशीलवार वर्णन करण्यात आलं आहे. या संभोग सुखाचे प्रकारही विषद करण्यात आले आहेत.

बायकी हावभाव असणाऱ्या पुरुषांना पापी किंवा अपराधी ठरवण्यात येत नसे. स्त्रियांच्या एकमेकींच्या रतिक्रीडेचंही सहजतेनं वर्णन करण्यात आलं आहे. खजुराहो किंवा ओडिशातील मंदिरांमध्ये हाच विचार खुलेपणाने मांडलेला दिसतो.

मध्य काळातील सखी भाव परंपरेला समलैंगिकतेचं उद्दातीकरण मानलं जाऊ शकतं. पश्चिमेकडेही युनान तसंच रोममध्येही प्रौढ आणि तरुणांचे एकमेकांशी शारीरिक संबंध समाजाला मान्य होते.

गंमतीशीर गोष्ट म्हणजे ज्या व्यभिचारी प्रथेची इंग्रजांनी ग्रीक लव्ह अशी हेटाळणी केली होती, त्याला फ्रान्सचे लोक 'व्हाइस अँग्लेस' संबोधत होते. प्रसिद्ध साहित्यिक ऑस्कर वाइल्ड पासून ख्रिस्तोफर इशरवूडपर्यंतच्या अभिजन वर्गातले प्रतिनिधी बेड ब्रेकफास्ट अँड बॉयच्या शोधात मोरोक्कोपासून मलायापर्यंत मुशाफिरी करत असत.

प्रेक्षकांना नवा विचार देणाऱ्या मिशेल फुको यांनी समलैंगिक असल्याचं कधी लपवलं नाही. दुर्दैव हे की दांभिक आणि दुतोंडी धोरणामुळे एलन ट्यूरिंगसारख्या प्रतिभाशाली गणितज्ज्ञ, संशोधकाला छळ आणि शोषणानंतर आत्महत्या करावी लागली.

खासगीपणा आणि एकांत हे मूलभूत अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं असतानाही पोलीस समलैंगिक व्यक्तींवर लक्ष ठेऊन त्यांना बेकायदा ताब्यात घेत असत. पाश्चिमात्य देशात ज्यांना थर्ड सेक्स म्हटलं जातं तशा अनेक माणसांना आपल्या देशात अपमानित व्हावं लागलं आहे, तसंच त्यांना आपली ओळख लपवावी लागली आहे आणि नाईलजाने वेश्यावृत्तीच त्यांच्या जगण्याच साधन बनली आहे.

कलम ३७७ च्या जोखडातून मुक्तता झाल्यानंतर त्यांना त्यांचं माणूसपण खुलेपणाने वागवता येईल. ख्रिश्चनबहुल अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये समलैंगिकता गुन्हा नाही. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता आहे.

आपण ज्या ईश्वराला मानतो त्याच परमेश्वराचे समलैंगिक व्यक्तीही बालक आहेत. म्हणूनच त्यांच्याप्रति भेदभाव करता कामा नये. दुर्दैव हे की गेल्या काही दिवसांत चर्चमध्ये अल्पवयीन आणि पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या लैंगिक शोषणांचे प्रकरणं उघडकीस आली आहेत. हे दडपण्याचा प्रयत्न व्हॅटिकनच्या अधिकाऱ्यांनी केला.

अशा परिस्थितीमध्ये पोप आणि कार्डिनल बिशप समलैंगिकते संदर्भात खुलेपणाने बोलण्यास कचरतात. याबाबत एक गोष्ट समजून घेणं फार महत्वाचं आहे. दोन प्रौढांमध्ये सहमतीने असणारे समलैंगिक संबंध आणि अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण यात प्रचंड फरक आहे. कलम ३७७ ची अंमलबजावणी कायम राहावी यासाठी हा युक्तिवाद देता येणार नाही.

समलैंगिकता हा आजार नाही तसंच ही मानसिक विकृतीही नाही. असं २१व्या शतकातील संशोधनानुसार स्पष्ट झालं आहे. त्यामुळे समलैंगिक म्हणजे काहीतरी विचित्र, विकृत असं ठरवलं जाऊ शकत नाही.

ज्यांची लैंगिक ओळख समलैंगिक आहे त्यांना त्यापद्धतीने जगण्यापासून वंचित ठेवलं जाऊ शकत नाही. डार्विनचा विकासवादाचा सिद्धांन्त चुकीचा आहे असं मानणाऱ्या व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात तसेच न्यायव्यवस्थेत आहेत. मोराचं प्रजजन त्याच्या अश्रूंमुळे होतं असंही मानणाऱ्या व्यक्ती आपल्याकडे आहेत. अशा व्यक्तींकडून तर्कसुसंगत निर्णयाची अपेक्षा करणं चुकीचं आहे.

स्वत:चे धार्मिक विश्वास,अंधविश्वास बाजूला ठेऊन कायद्याची सामाजिक उपयुक्तता ध्यानात घेऊन या विषयाकडे पाहणं आवश्यक आहे. ५ न्यायमूर्तींचं खंडपीठ यावेळी या विषयावर एकत्रित अभ्यास करत होते.

हा विषय केवळ समलैंगिकांपुरता मर्यादित नाही. कायद्याचं राज्य आणि कायद्या समोरच्या समानतेच्या मूलभूत हक्कांविषयी आहे. कलम ३७७ हटवण्याच्या मोहिमेचं समर्थन केल्यास समलैंगिक ठरवलं जाईल अशी भीती असल्याने देशातले अनेकजण याबाबत अळीमिळी गुपचिळी ठेऊन असत.

समलिंगी संबंधही नैसर्गिकच आहेत. पाश्चिमात्य देशांमध्ये या विषयावर बरंच संशोधन झालं आहे. त्यानुसार अशाप्रकारच्या लैंगिक संबंधांमागे अनुवंशिक कारणं असतात. समलिंगी संबंधांच्या प्रकरणात स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. जन्मतःच ही प्रवृत्ती मनुष्यात दिसते. सेक्शुअल ओरिएंटेशन आणि जेंडर (लिंग) यामध्ये बराच फरक आहे.

कलम ३७७ गुन्ह्याच्या परिघात आल्यामुळे एलजीबीटी (लेस्बियन गे, बायसेक्शु्अल, ट्रान्सजेंडर) समुदाय स्वतःला अघोषित गुन्हेगार मानत होते. समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही वेगळा आहे. समाज बदलतो तशा नैतिकताही बदलतात. १६० वर्ष जुनी नैतिक मूल्य आजच्या काळात लागू होत नाहीत असंही आपण म्हणू शकतो.

‌ कायदा आयोगाच्या अहवालानुसार समलिंगी संबंध अपराधाच्या परिघात येत नाहीत. केंद्र सरकारने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हानही दिलेलं नव्हतं. जर समलिंगी संबंध नैसर्गिक असतील तर गुन्हा कसा होईल.

जर एखाद्याचं सेक्शुअल ओरिएंटेशन वेगळं आहे, तर तो अपराध कसा होईल. हा आजार नसून नैसर्गिक असल्याचं आरोग्य क्षेत्रात म्हटलं जातं. समलैंगिकता आजार नाही. हे दोन समलिंगी व्यक्तींनी एकत्र राहण्याचं प्रकरण आहे.

समलैंगिकता फक्त मनुष्यप्राणीच नाही, तर जनावरांमध्येही पाहायला मिळते. हे प्रकरण केवळ कलम ३७७ च्या वैधतेशी निगडीत आहे. याचं लग्न किंवा इतर नागरिकांच्या अधिकारांशी देणंघेणं नाही. हा एखाद्याचा खाजगी अधिकार असू शकतो.

भादवी ३७७ अंतर्गत समलिंगी संबंध गुन्हा ठरवल्यास ते मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या निर्णयामुळे प्रौढांमधील समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली होती. देशभरातील धार्मिक संघटनांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला होता.

या नंतर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने ११ डिसेंबर २०१३ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत कलम ३७७ अंतर्गत समलिंगी संबंध गुन्ह्याच्या श्रेणीतच ठेवले.

या मुद्द्यावर कायद्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटलं होतं. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानेही या निकालाविरोधात दाखल केलेली फेरविचार याचिकाही फेटाळली होती.

समलैंगिक संबंध कायदेशीर का बेकायदेशीर याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला होता . कलम ३७७ नुसार समलैंगिकता हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून, देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे.

समलैंगिक असणे यात कोणताही अपराध किंवा गुन्हा नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. समलैंगिक असणार्‍या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलैंगिक संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री-स्त्री अथवा पुरुष-पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध.

समलैंगिक संबंध म्हणजे काय? समलिंगी,होमो सेक्शुअल ही नैसर्गिक अवस्था आहे. साधारणतः ७ ते १४ या वयात ती जन्माला येते. या वयात येणार्‍या काही जणांना समलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटू लागते. ते शरीरसुखाच्या संदर्भात असते असे नाही.

पण, आपल्यासारख्याच दिसणार्‍या आपल्याच वयाच्या,किंवा त्याहून मोठय़ाही व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते. पुढे त्यांच्याशीच घट्टमुट्ट मैत्री होऊ लागते. हे सगळं त्या वयात शारीरिक, मानसिक वाढीसाठी पूरक-पोषकच असते.

त्यात ‘सेक्स’ अभिप्रेत नसतो, त्याची जाणीवही पुसटशी असते; पण आकर्षण वाटते ते मात्र फक्त समलिंगी व्यक्तींचंच, पुढे काही जण याच अवस्थेत अडकून पडतात. जन्मभर या अवस्थेत तरी राहतात, नाहीतर काही काळाने बायसेक्शुअल अवस्थेत जातात. समलिंगी शरीरसंबंध निर्माण होतात. कारण ही अवस्था संपत नाही.

गे आणि लेस्बियन म्हणजे काय? पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना ‘गे’ म्हटले जाते. पुरुषाला फक्त पुरुषाचंच आकर्षण असणे व पुरुषाला फक्त पुरुषाशीच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं अशा पुरुषांना ‘गे’ म्हटले जाते.

तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना ‘लेस्बियन’ म्हटले जाते. अशा स्त्रियांना फक्त स्त्रियांचेच आकर्षण वाटते. स्त्रियांबरोबरच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते.

समलैंगिक हे अनैसर्गिक आहे का? समलैंगिक असणे नैसर्गिक आहे. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं. म्हणजेच तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटते, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावेसे वाटते याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो.

समलैंगिकता ही विकृती किंवा आजार आहे का? समलैंगिकतेकडे कल असणे ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे. आणि हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. पुरुषाला जसे स्त्रीचे आकर्षण वाटणे,

स्त्रीला पुरुषाचं आकर्षण वाटणे, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणं हे नैसर्गिक आहे. त्याच प्रमाणे स्त्रीला-स्त्रीचं, पुरुषाला-पुरुषाचं आकर्षण वाटू शकते. समान लिंगाच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्याकडे कल वाढतो. समलिंगी संबंध ठेवणारे अनेकजण समाजात आहेत.

समलैंगिकते संदर्भात कायदा काय आहे? मुखमैथुन, गुदमैथुन त्याचप्रमाणे हस्तमैथुन करणे याला कायद्याची मान्यता नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे.अशा प्रकारे संबंध करणार्‍या व्यक्तींला जन्मठेप अथवा काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. भारतीय दंडसहिता कलम ३७७ नुसार समलिंगी संबंधांना मान्यता मिळाली आहे. भारतात समलैंगिक संबंध आता अधिकृत; गुन्हा नाही.

ज्या कलम ३७७ वर अनेक वर्षांपासून देशभरात चर्चा सुरू आहे, त्या अंतर्गत अनैसर्गिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात १५० वर्षांत २०० व्यक्तींनाच दोषी ठरवण्यात आलेले आहे. त्यामुळे ते कलम असून नसल्या सारखेच होते.

त्याचा काही प्रमाणात गैरवापर ही होत होता. त्यामुळे ते कलम रद्द करण्यात यावे अशी सर्वोच्च न्यायालयाची फार जुनीच शिफारस होती किंवा कलम रद्द करण्याचे अधिकार संसदेला आहेत हे सुचित केले होते.ती सुचेना किंवा शिफारस सरकारने आता अमलात आणली आहे असे आपल्याला म्हणता येईल.

- ॲड मिलिंद दत्तात्रय पवार माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा बार असोसिएशन, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com