
चिंतन शिबिरातून काँग्रेसला फायदा ? कामराज प्लॅन पुन्हा लागू होणार
राजस्थानमधील उदयपुर येथे कॉंग्रेसचं तीन दिवसीय चिंतन शिबिर पार पडलं. या शिबिरात पक्षबांधणी बरोबरच अनेक निर्णय घेण्यात आलेत. सोशल इंजिनियरींगचा प्रयोगही पक्ष करणार आहे. हे चिंतन शिबिर म्हणजे कॉग्रेसची 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारी मानलं जातंय. अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती-जमाती आणि वंचित घटकांना पक्षामध्ये ५० टक्के पदे राखीव ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. या शिबिराच्या समारोपाप्रसंगी कॉंग्रेसचा जनतेशी संपर्क तुटल्याचं, मान्य करायला पाहिजे असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं होतं.
कॉंग्रेसने एक कुटुंब एक तिकीट हे नवीन सूत्र स्वीकारलंय, जर एकाच कुटुंबातील दुसऱ्या सद्स्याला तिकीट हवं असल्यास त्याने पक्षात किमान पाच वर्ष काम केलेल असावं अशी अट घालण्यात आलीय. तसंच सोनिया गांधींनी 'भारत जोडो' अभियान ऑक्टोबरमध्ये गांधी जयंतीपासून सुरु करणार असल्याचं सांगितलंय. या चिंतन शिबिरातून कॉंग्रेसला खरचं फायदा होणार आहे का याविषयी ऊहापोह करणारा हा लेख
कॉंग्रेस पक्षावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप होत आलाय. तसंच ज्येष्ठ नेत्यांकडेच पक्षांमधील प्रमुख पद असून युवकांना मात्र संधी मिळत नसल्याचा सूर उमटताना दिसतोय. कॉंग्रेसनं या मुद्दयांचा चिंतन शिबिरात विचार केल्याचं दिसतंय. मात्र त्यावर निर्णय होतील का हा प्रश्न अलाहीदा. कॉंग्रेसचा जनतेशी कनेक्ट तुटलाय हे मान्यच करावं लागेल आणि तो कनेक्ट पुन्हा तयार करण्यासाठी लोकांमध्ये मिसळावं लागेल असं मत नेते राहुल गांधींनी मांडलं होतं. पण याविषयी कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी बोलले असता त्यांनी हे खरं असल्याचं म्हंटलय. नाव न सांगण्याच्या अटीवर कार्यकर्ता बोलत होता. ''२०१४ नंतर कॉंग्रेसचा आत्मविश्वास ढळला होता. २०१९ ला कॉंग्रेस पुन्हा कामाला लागली मात्र भाजपाने जादुई आकडा गाठल्याने कार्यकर्त्यांनी विश्वास गमावला, आणि पक्षानेही.'' त्यामुळे आता या चिंतन शिबिरातील घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाल्यास पक्ष पुन्हा उभा राहिल असं वाटतं. तर काही कार्यकर्त्यांनपक्षसंघटनेत नेहमीच ज्येष्ठ मंडळींचं वर्चस्व राहिलंय. अनेकांनी गांधी कुटुंबामुळेच पक्ष आबाधित राहिल असं वाटतं.
पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी, ''आपल्यांला लोकांमध्ये जावं लागेल. फक्त आपल्यासाठी नाही तर देशासाठी, वरिष्ठ नेते, कनिष्ठ नेते किंवा कार्यकर्ता असो सर्वांनी लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज असल्याचं सांगितलं. तसंच आपला लोकांशी संपर्क तुटलाय हे मान्य करायला हवं, तो पुन्हा तयार करायला हवंय, असं राहुल गांधीं म्हणालेत. त्यांचा रोख कामराज प्लॅनकडे होता असं म्हणायला वाव आहे.
नेहरूंच्या काळात लागू झालेला कामराज प्लॅन:
पक्षातील प्रमुख पदांवर युवकांना जबाबदारी मिळावी आणि नवीन नेतृत्व तयार व्हावेत यासाठी प्रमुख पदांवर असणाऱ्या नेत्यांनी आपली पदं सोडावी. तसंच संघटनेत आपल्या अनुभवाचा उपयोग करुन पक्षसंघटनासाठी काम करावं अशी योजना कामराज यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंना सांगितली होती. सप्टेबर १९६३ च्या जवळपासची ही घटना आहे.
त्यानुसार पहिलाच राजीनामा कामराज यांनी दिला होता. त्यानंतर मोरारजी देसाई, लालबहादुर शास्त्री बीजू पटनाईक, बाबू जगजीवन राम यांच्यासह ६ मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर हे सर्व पक्षसंघटनेच्या कामात उतरले होते. यानंतर जवाहरलाल नेहरुंनी कॉंग्रेस पक्षाचं अध्यक्षपदी कामराज यांची निवड केली होती. पुढे याच कामराज यांना पक्षाचं अध्यक्षपद देण्यात आलं. कामराज यांनी नेहरुंच्या निधनांनंतर तसंच लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतरही पंतप्रधानपद न घेता ते इंदिरा गांधींना दिलं होतं.
राहुल गांधींनी उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिराच्या समारोपावेळी केलेल्या भाषणाचा नूर असाच काहीसा होता. कॉंग्रेस पक्षातच पक्षबांधणीसाठी आणि युवकांना मोठ्या प्रमाणात संधी मिळावी यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी प्रमुख पदांचे राजीनामे दिल्याची घटना कॉंग्रसच्या विस्मरणात गेलीय का असा प्रश्न पडतो.
कॉंग्रेसच्या चिंतन शिबिराचा खरचं फायदा होइल का ?
कॉंग्रेसच्या चिंतन शिबिराविषयी राजकीय आभ्यासकांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं. कॉंग्रेसला चिंतन करण्यासाठी बराच उशिर झाला असून चिंतनाचा फायदा होईल असं वाटत नसल्याचं मत राजकिय विश्लेषक प्रकाश पवार यांनी व्यक्त केलं. कॉंग्रेस घराणेशाही आणि श्रीमंतीच्या थाटातून जमीनीवर येऊन काम करत नाही, तोपर्यंत कॉंग्रेसला सत्ता मिळणं अवघड आहे. कॉंग्रेसमध्ये घराणेशाही आणि संरजामशाही आहे, किती नेते दलित वस्त्यांवर जातायत, लोकांशी बोलताय तर एकही उहाहरण द्यायला नाही. याउलट कॉंग्रेसचा सहकारी असलेला पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आहे. या पक्षातील ८२ वर्षीय ज्येष्ठ नेते शरद पवार लोकांमध्ये जाऊन मिसळतात, त्यांच्याशी नेहमी कनेक्ट ठेवतात., दौरे करतात, तृणमूल कॉग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील लोकांमध्ये जातात. मात्र कॉंग्रेसचा कोणता नेता लोकांशी बोलतोय, वस्त्यांवर जातोय असं चित्र आढळत नाही.
पुण्याचे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी,'' अनुसूचित जाती -जमाती, अल्पसंख्यक तसेच वंचित घटकांना ५० टक्क्यांपर्यंत प्रतिनिधीत्व देण्याच्या निर्णयाने नक्कीच फायदा होईल. संघटनात्मक काम आणि पुन्हा 'भारत जोडो' मधून जनतेशी जोडलं जाण्याने नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केलाय. चिंतन शिबिराचा फायदा होईल असं त्यांना वाटतं.
कॉंग्रेसच्या चुकांचा भाजपाला होतोय फायदा -
कॉंग्रेस पक्षाचं २०२४ मध्ये पुनरुज्जीवन होणं अवघड असल्याचं प्रकाश पवारांनी सांगितलंय. ज्येष्ठ कार्यकर्ते मुख्य पदं सोडण्यास तयार नाही. अगदी राहुल गांधीनी युवकांना संधी देण्यासंदर्भात मांडलेल्या भुमिकांनाही पक्षातून विरोध झाला. युवकांना संधी देण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी पदं सोडावीत, आणि पक्षबांधणीत उतरावं अशी कामराज योजना सप्टेंबर १९६३ साली अमलात आली होती याचाही विसर कॉंग्रेसला पडलाय एकंदरितच कॉंग्रेस करत असलेल्या चुकांचा फायदा भाजपला होतोय.
Web Title: What Will Be The Outcome Of Congresss Udyapur Chintan Shivir Will They Implement Kamaraj Plan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..