esakal | Privacy Policy बद्दल WhatsApp ची मोठी घोषणा; हायकोर्टात म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

Privacy Policy बद्दल WhatsApp ची मोठी घोषणा; हायकोर्टात म्हणाले...

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या व्हॉट्सॲप गोपनीयता धोरणाच्या अंमलबजावणीस अखेर ब्रेक लागला आहे.‘‘ देशामध्ये डेटा संरक्षण विधेयक लागू होत नाही तोवर या धोरणाच्या निवडीसाठी युजर्संना भाग पाडले जाणार नाही त्यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे. आता संसदेने विधेयकास मान्यता दिल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.’’ असे व्हॉट्सॲपने आज दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. मुख्य न्यायाधीश डी.एन.पटेल आणि न्या. ज्योती सिंह यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. निर्धारित वेळेमध्ये गोपनीयता धोरणाचा स्वीकार न करणाऱ्या युजर्संच्या वापरावर कोणतीही मर्यादा आणली जाणार नाही, असेही व्हॉट्सॲपकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा: नरेंद्र मोदी यांची कामराज योजना

व्हॉट्सॲपची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे म्हणाले की, ‘‘ गोपनीयता धोरणाला स्थगिती देण्याचा आमचा निर्णय ऐच्छिक असून त्याचा स्वीकार करावा म्हणून आम्ही लोकांना भाग पाडणार नाही. तथापि, युजर्संना अपडेटसंदर्भातील माहिती मात्र दिसत राहील.’’ साळवे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सध्या गोपनीयता धोरणाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आली असली तरीसुद्धा हे धोरण मात्र अस्तित्वात असल्याचे सांगितले. ‘‘ तुम्ही गोपनीयता धोरणाची अंमलबजावणी करत नसला तरीसुद्धा ते धोरण मात्र अस्तित्वात आहे. कोणत्याही दिवशी हे धोरण पुढे येऊ शकते.’’ असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यावर साळवे यांनी देखील डेटा संरक्षण विधेयकाचे रूपांतर कायद्यामध्ये होत नाही तोवर अशीच स्थिती कायम राहील, असे सांगितले.

हेही वाचा: भयानक! बक्षीस दिलं नाही, मुंबईत तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या बाळाची केली हत्या

म्हणून व्हॉट्सॲप उच्च न्यायालयात
नव्या वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयकान्वये सरकार आणि खासगी कंपन्यांकडून वापरण्यात येणाऱ्या युजर्संच्या डेटावर बंधने येणार असून यावर नियामक यंत्रणेची देखरेख असेल. सध्या संयुक्त संसदीय समिती या विधेयकाचा अभ्यास करत असून या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी पुढील पावसाळी अधिवेशनापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. स्पर्धात्मक आयोगाने व्हॉट्सॲपच्या नव्या गोपनीयता धोरणाच्या अनुषंगाने चौकशीचे आदेश दिले होते, आयोगाच्या या आदेशांना स्थगिती देण्यास एकसदस्यीय खंडपीठाने नकार दिला होता. त्याविरोधात फेसबुक आणि व्हॉट्सॲपने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. भारतात व्हॉट्सॲपचे गोपनीयता धोरण फेब्रुवारीपासून लागू होणार होते पण युजर्स आणि तज्ज्ञांनी त्याला आक्षेप घेतला होता.

व्हॉट्सॲपचे म्हणणे...

युजर्संचे मेसेज, कॉल व्हॉट्सॲप अथवा फेसबुक पाहू शकत नाही
युजर्संचे काँटॅक्ट आणि लोकेशन फेसबुकसोबत शेअर होणार नाही
व्हॉट्सॲप ग्रुप प्रायव्हेटच राहणार, युजर्स स्वतःचा डेटा डाउनलोड करतील

loading image