भारतात कोरोनाचा सर्वाधिक शिरकाव कोणत्या देशामुळे झाला? संशोधकांचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 27 September 2020

प्रसाराच्‍या पहिल्या टप्प्यात ज्यांना कोरोनाची लागण झाली असे रुग्ण आधी परदेशात जाऊन आले होते

नवी दिल्ली-  दुबई व ब्रिटनमधील प्रवाशांमुळे भारतात कोरोनो विषाणूंचा शिरकाव झाला, असे मत मंडी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थे (आयआयटी)ने केलेल्या विश्‍लेषणात्मक अभ्यासात व्यक्त केले आहे.

‘ट्रॅव्हल मेडिसिन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनपर लेखात म्हटले आहे की सुरुवातीला आंतरराष्ट्रीय प्रवाशांमुळेच भारतात कोरोनाचा प्रसार झाला. ‘आयआयटी मंडी’मधील सहाय्यक प्राध्यापक सरिता आझाद म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या फैलावाचे निरीक्षण आम्ही केले. त्यातून विदेशातून देशात आणि नंतर भारतात त्याचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरलेल्या मुख्य घटकांचा शोध घेतला. प्रसाराच्‍या पहिल्या टप्प्यात ज्यांना कोरोनाची लागण झाली असे रुग्ण आधी परदेशात जाऊन आले होते, त्यांच्‍यामुळे देशात कोरोनाची लागण झाली. या विषाणूंचे सर्वाधिक संक्रमण स्थानिक असल्याचेही दिसले.’’

जे रुग्ण जानेवारी ते एप्रिल या काळात परदेशात जाऊन आले होते, त्यांच्या माहितीचा प्राथमिक स्त्रोत म्हणून संशोधनासाठी वापर करण्यात आला. सुरुवातीला मुख्यत्वे दुबई (१४४) आणि ब्रिटन (६४) मधून आलेल्या प्रवाशांमधून कोरोनाचे संक्रमण झाल्याचे आढळले, असे त्यांनी सांगितले. प्रा. आझाद यांनी त्यांची विद्यार्थिनी सुषमा देवी यांच्या मदतीने हा विश्‍लेषणात्मक अभ्यास केला आहे.

कोरोनाचा कहर संपता संपेना

अभ्यासातील निरीक्षणे

-कोरोनाचा भारतात प्रवेश होण्यास व राज्यांमध्ये त्याचा प्रसार होण्यास दुबई आणि ब्रिटन हे देश कारणीभूत.
- दुबईहून आलेल्या प्रवाशांमुळे संसर्ग जास्त.
- देशातील पहिल्या टप्प्यातील (२५ मार्च ते १४ एप्रिल) लॉकडाउनच्या काळात तमिळनाडू, दिल्ली, आंध्र प्रदेशमधील कोरोना रुग्णंमध्ये वाढ.
- या राज्यांमधील रुग्णांमुळे इतरत्र संसर्ग होण्याचे प्रमाण कमी
- गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, जम्मू-काश्‍मीर आणि कर्नाटक या राज्यांत स्थानिक संक्रमण जास्त. आंतरराज्यातही फैलाव.

प्रा. सरिता आझाद म्हणाल्या...

- कोरोनाची साथ कमी होईल तेव्हा असे संशोधन कार्य भविष्यात नोंदीच्या स्वरुपात म्हणून उपयुक्त ठरु शकते.
- या अभ्यासासाठी सद्यस्थितीतील माहितीचा वापर करून भारतातील साथीचा मागोवा घेतला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: which country responsible for coronavirus spade in india